Tue, Jun 18, 2019 20:33होमपेज › Solapur › सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तिरंगी लढत

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तिरंगी लढत

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:42PMसोलापूर : महेश पांढरे 
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून यासाठी नुकतीच आरक्षण सोडत पार पडली आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजकीय वातावरण आता चांगले तापू लागेल असले तरी  राष्ट्रवादीचे आ. रमेश कदम यांनी स्वतंत्र पॅनेलची तयारी केली आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे आता कोणासोबत जायचे याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सोलापूर बाजार समितीची निवडणूक पहिल्यांदाच थेट शेतकर्‍यांमधून होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आता मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने निवडणुकीच्यादृष्टीने सर्वसाधारणमधून निवडून द्यावयाच्या 15 जागांसाठी गण निश्‍चित करण्यात आले असून त्यासाठीचे आरक्षणही आता जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये कळमण, नान्नज, पाकणी, हिरज, कुंभारी, होटगी, कणबस, कंदलगाव, भंडारकवठे, औराद हे खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आले आहेत. मंद्रुप आणि बाळे हे गण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. मुस्ती गण इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे, तर मार्डी हा गण भटक्या- विमुक्त जाती-जमातींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. बोरामणी गण अनुसूचित जाती-जमाती या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे इच्छुकांनी आता नेतेमंडळींकडे मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सध्या राजकीय परिस्थिती पाहिली तर राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगलेच लक्ष घातल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपसह मित्रपक्षाचे पॅनल या निवडणुकीत निश्‍चित राहणार आहे. वर्षानुवर्ष सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेस पक्षाला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरील सत्ता कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही. त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणमधील सर्वच नेतेमंडळी या निवडणुकीसाठी एकवटली आहेत. त्यामुळे सहकारमंत्र्यांच्या पॅनलला ही निवडणूक आता सोपी राहणार नाही. मात्र राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बाजार समितीसाठी स्वतंत्रपणे तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आ. कदमांचे कार्यकर्ते या निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. दुसरीकडे दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे आता मोठा पेच निर्माण झालेला आहे.