Wed, Mar 27, 2019 00:28होमपेज › Solapur › भाजपने बाजार समितीचे रणशिंग फुंकले

भाजपने बाजार समितीचे रणशिंग फुंकले

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 9:02PM

बुकमार्क करा
सोलापूर : संतोष आचलारे

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख व पालकमंत्री ना. विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी भाजपने शेतमाल तारण योजनेचा डंका वाजवून निवडणुकीचा बिगुल वाजविला. 

यावेळी केवळ सरकारी कार्यक्रमातून मार्केटिंग करण्याचा प्रयत्न हलग्या वाजवून करण्यात आला. हमीभावाने शेतमालाची खरेदीच होत नसल्याने भरसभेत एका शेतकर्‍याने सहकारमंत्री ना. देशमुख यांना हमीभावाने खरेदी कधी होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला.

बाजार समितीच्या मार्केट यार्डातील कै. वि. गु. शिवदारे सभागृहात सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास महापौर शोभा बनशेट्टी, दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती ताराबाई पाटील, उत्तर पंचायत समितीच्या सभापती संध्याराणी पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, सचिन कल्याणशेट्टी आदी उपस्थित होते.
शेतमाल तारण योजनेंतर्गत शेतकर्‍यांना बाजारभावाच्या दरानुसार मालाच्या किमतीच्या 75 टक्क्यांपर्यंत कर्ज 6 टक्के दरसाल शेकडा या व्याजदराने देण्यात येत आहे. या योजनेचा 189 शेतकर्‍यांनी लाभ आतापर्यंत घेतला आहे. या उपक्रमातून या शेतकर्‍यांचा 63 लाख 81 हजार रुपयांचा माल तारण स्वरूपात ठेवण्यात आला आहे. या योजनेत सहभागी झालेल्या 20 शेतकर्‍यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जाच्या धनादेशाचे वाटप जाहीर कार्यक्रमात करण्यात आला.

खरीप हंगामात शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या धान्याची हमीभावाने अत्यंत  उशिरा खरेदी करण्यात आली. ज्या शेतकर्‍यांकडे माल होता त्या शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या खरेदी केंद्रात माल घातला. दीड महिन्यानतंरही शेतकर्‍यांना सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांची रक्कम न मिळाल्याने यावेळी शेतकर्‍यांची नाराजी दिसून आली. सध्या तूर शेतकर्‍यांकडे तयार असतानाही त्याची खरेदी होत नाही. त्यामुळे पहिल्यांदा आधारभावाने खरेदी करण्यात यावी, अशी अपेक्षा यावेळी शेतकर्‍यांकडून व्यक्त होत होती. 

यावेळी सहकारमंत्री देशमुख म्हणाले, ई-नामच्या प्रणालीने सर्व प्रकारचा शेतीमाल लिलाव ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. व्यापारी हमीभावाने शेतकर्‍यांचा माल विकत नसल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची भूमिका घेण्यात येणार आहे. बाजार समिती ही आपली बापजाद्यांची इस्टेट आहे असे समजून मागील काळात सत्ताधार्‍यांनी कारभार केल्याने शेतकरी योजनेपासून वंचित राहिला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शेतकर्‍यांना सर्व सुविधा  मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.