Sat, Sep 22, 2018 14:35



होमपेज › Solapur › तान्ह्या बाळाला रुळावर फेकले, पोलिसाने वाचवले

तान्ह्या बाळाला रुळावर फेकले, पोलिसाने वाचवले

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 07 2018 1:06AM



सोलापूर : प्रतिनिधी

 ‘देव तारी त्याला कोण मारी’ असे म्हणतात त्याची प्रचिती नुकतीच आली. सोलापूर मध्य रेल्वे विभागाच्या दौंड रेल्वेस्थानकापासून अवघ्या अर्धा किलोमीटवर एका निर्दयी माता-पित्यांनी आपल्या एक महिन्याच्या गोंडस मुलाला गुरुवारी मध्यरात्री रुळावर फेकून दिले होते; परंतु  एका पोलिसाच्या रूपात देवाने त्या बाळाला वाचवल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

दरम्यान, रुळावर रडत पडलेल्या बाळास उचलून उराशी घट्ट पकडत विनीतकुमार या जवानाने त्या बाळास घेऊन तातडीने रुग्णालय गाठल्याने बाळाची प्रकृती सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 
गुरुवारी पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास आरपीएफचे जवान विनीतकुमार कुर्डुवाडी ते दौंड या मार्गावर ड्युटी करत होते. दौंड रेल्वेस्थानकाजवळ अंधारातून बाळ रडण्याचा आवाज येऊ लागला. ज्या दिशेने आवाज येत होता, त्या दिशेला जाऊन हॅलोजनच्या उजेडात आवाज शोधण्याचा प्रयत्न केला.

निर्दयी माता-पित्यांनी त्या बाळाला एका कापडामध्ये गुंडाळून प्लास्टिक पिशवीत ठेवून रेल्वे खांबाजवळ फेकून दिले होते. आरपीएफ जवान विनीतकुमार यांनी ताबडतोब त्या  बाळाला कुशीत घेतले. काही मिनिटांतच बाळाने रडणे बंद केले आणि त्या बाळाला लक्षात आले की आपल्याला वाचवायला कोणीतरी आले. या भावनेने ते बाळदेखील विनीत कुमार यांच्या कुशीत शांत झोपले. परंतु त्या आरपीएफ जवानाने वेळेचा थोडाही विचार न करता दौंड येथील एका सरकारी रुग्णालयात उपचारासाठी त्या बाळास पाठाविले. तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून बाळ सुखरुप असल्याची खात्री केली.

आरपीएफ जवानांनी त्या गोंडस बाळाची कस्टडी गुरुवारी सकाळी लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केली.लोहमार्ग पोलिसांनी पुढील उपचार करण्यासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात त्या बाळास दाखल केले तसेच दिवसभर कोर्टाचे कामकाज पूर्ण केले. कोर्टाच्या आदेशानुसार त्या बाळास सुखरुपजागी ठेवले जाणार असल्याची माहिती दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार ए.के. मोतेवार यांनी दिली.