होमपेज › Solapur › वृद्धावर न्यायाधीशांच्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

वृद्धावर न्यायाधीशांच्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

Published On: Dec 22 2017 1:30AM | Last Updated: Dec 21 2017 8:58PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

बुधवारी दुपारी सोलापूर जिल्हा न्यायालयात कोर्ट हॉलमध्ये झालेल्या थरारानंतर रात्री उशिरा जेलरोड पोलिस ठाण्यात सत्र न्यायाधीशांच्या फिर्यादीवरून हत्यारानिशी आलेल्या वृद्धावर  खुनाचा  प्रयत्न  केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच  प्रकारची  घटना  ही गेल्या काही महिन्यांपूर्वी बार्शी न्यायालयातही घडली असून त्यावेळी याच वृद्धावर बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

अतिरिक्त  सत्र  न्यायाधीश उल्हास बळवंत हेजीब ( रा. सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून पोपट शामराव ननवरे (वय 67, रा. हळदुगे, ता. बार्शी, जि. सोलापूर) या  वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास बुधवारी रात्री अटक करण्यात आली आहे.

बुधवारी दुपारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश हेजीब हे त्यांच्या न्यायालयातील  न्यायालय  प्रक्षालेमध्ये न्यायदानाचे  काम करीत होते.  त्यावेळी पोपट  ननवरे हे माहितीच्या अधिकारात माहितीची मागणी करीत प्रक्षालेमध्ये आले. त्यावेळी सत्र न्या. हेजीब  व   न्यायालयातील इतर कर्मचारी यांच्या जीवितास धोका करण्याच्या उद्देशाने विनापरवाना कुर्‍हाड, एक्स ब्लेड, विळा अशी घातक हत्यारे आणून ननवरे यांनी दहशत निर्माण केली तसेच न्या. हेजीब व न्यायालयातील कर्मचार्‍यांच्या कामकाजात तसेच पोलिसांच्या कामकाजात अडथळा निर्माण करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली म्हणून जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक आयलाने तपास करीत आहेत.

पोपट ननवरे यांच्याविरुद्ध गेल्या काही महिन्यांपूर्वी बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये त्यांना पोलिस कोठडीदेखील मिळालेली आहे तसेच सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील सदर बझार पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल झालेला होता. त्यामुळे पोपट ननवरे हे अशाप्रकारचे गुन्हे का करतात, असा प्रश्‍न उपस्थित होतो. मागील काही दिवसांत न्यायालयाची सुरक्षा वाढवूनही हा प्रकार घडल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे न्यायालापरिसरातील सुरक्षा वाढवावी अशी मागणी होत आहे.