Tue, May 21, 2019 04:47होमपेज › Solapur › सहायक फौजदाराची आत्महत्या

सहायक फौजदाराची आत्महत्या

Published On: Mar 21 2018 11:01PM | Last Updated: Mar 21 2018 11:00PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर पोलिस पेट्रोल पंपावरील 5 लाख रुपयांच्या लूट प्रकरणात फिर्यादी असलेल्या सहायक फौजदाराने बुधवारी सकाळी  जुना  तुळजापूर  नाक्याजवळील  पुलाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे  पोलिस  दलात  खळबळ उडाली असून पेट्रोल पंपावरील रोकड लुटीच्या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

सहायक पोलिस फौजदार मारुती लक्ष्मण राजमाने (वय 56, रा. विद्यानगर, शेळगी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. सोलापूर शहर पोलिसांचा अशोक चौक पोलिस चौकीमागे पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर इनजार्च म्हणून राजमाने हे कार्यरत होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोल पंपावर जमा झालेली 5 लाख रुपयांची रोकड पोलिस  मुख्यालयात  जमा करण्यासाठी जाताना सहायक फौजदार राजमाने  यांना मारहाण करून सहा जणांनी ती रोकड लुटून नेली होती. याबाबत सुरुवातीला जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन नंतर तोे जोडभावी पेठ पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

या गुुन्ह्याचा तपास करताना राजमाने हे प्रत्येक वेळी वेगवेगळी घटना सांगत होते. त्यामुळे हा गुन्हा एका पोलिस ठाण्याकडून  दुसर्‍या पोलिस ठाण्याकडे वर्ग करावा लागला. तसेच राजमाने हे ज्या रस्त्याने गेल्याचे सांगत होते, त्या रस्त्यावरील सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले असता त्यामध्ये राजमाने कुठेही दिसून आलेले नाहीत. राजमाने यांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांच्या डोळ्यांमध्ये काहीही टाकण्यात आलेले नसल्याचे  दिसून आले आहे. राजमाने यांच्या घरातूनच पोलिसांनी सुमारे 2 लाख रुपये जप्त केले असून यातील काही रक्कम ही  पेट्रोल पंपावरील भरणाच असल्याचे निष्पन्न  झाले  असून उर्वरित  रकमेबाबत राजमाने यांच्याकडे विचारणा करण्यात येत   होती.  या  रक्कम लुटीच्या प्रकरणात एकूणच राजमाने यांच्या भूमिकेमुळे त्यांच्यावरच संशय निर्माण झाला होता.  या  घटनेचा तपास जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय पवार व  शहर गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. पोलिस अधिकार्‍यांकडून बुधवारी या प्रकरणाचा तपास अंतिम निष्कर्षापर्यंत येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

परंतु पोलिसांचा तपास हा निष्कर्षापर्यंत येण्याअगोदरच बुधवारी सकाळी मारुती राजमाने यांनी पुणे-हैदराबाद रोडवरील रुपाभवानी मंदिराजवळील जुना तुळजापूर नाक्याच्या पुलावरील लोखंडी बारला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजमाने हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला जातो असे सांगून पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर   पडले आणि त्यांनी महामार्गावरील पुलावर आत्महत्या केली. 

याबाबतची माहिती मिळताच पोलिस आयुक्त महादेव तांबडे, उपायुक्त अपर्णा गिते, पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्त परशराम पाटील, शर्मिष्ठा घारगे, जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय पवार, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्यासह  पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. घटनास्थळाची पाहणी करून जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे हवालदार डी. आय. गायकवाड यांनी राजमाने यांना खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले.  डॉ. चैताली नेमणार यांनी शासकीय रुग्णालयात मारुती राजमाने यांना मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदन करण्यात  आले. यावेळी राजमाने यांच्या अंगावरील कपड्यामध्ये दोन चिठ्ठ्या मिळून आल्या असून त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. बुधवारी सायंकाळी राजमाने यांच्यावर त्यांच्या मूळ गावी कोरवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस निरीक्षक बहिरट तपास करीत आहेत.

Tags : solapur, assistant police, Suicide,