होमपेज › Solapur › आसरा नव्हे हा तर मृत्यूचा चौक

आसरा नव्हे हा तर मृत्यूचा चौक

Published On: Feb 06 2018 10:57PM | Last Updated: Feb 06 2018 9:23PMसोलापूर : इरफान शेख

आसरा चौकातील सिग्नल व्यवस्था दिवसेंदिवस  कोलमडू  लागली आहे. शहरातून आलेले वाहनधारक जीव मुठीत धरुन सिग्नल ओलांडत असतात. अनेकांनी याला मृत्यू चौक अशी उपमा दिली आहे. रविवारी झालेल्या अपघातात नंदिनी माखरिया या चिमुरडीला जीवदान मिळाले आहे.

शहरातील वाहनधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.वाहतूक शाखेच्या वतीने चौकाचौकांत सिग्नलची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. परंतु या चौकात अतिक्रमणांचा विळखादेखील वाढतच चालला आहे. फळविक्रेते, बेशिस्त रिक्षाचालक, पानटपर्‍या, भजींच्या गाड्या यामुळे फूटपाथ झाकले गेले आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्‍नदेखील मोठा होत चालला आहे. वाहनधारक या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाले आहेत.अनेक नागरिकांनी फूटपाथवर स्टॉल लावून अडथळा निर्माण करणार्‍या विक्रेत्यांसोबत अनेकवेळा तक्रारी सुध्दा केल्या आहेत. मनपाच्या वतीने कारवाईवेळी हे फळविक्रेते जातात व तात्पुरते अतिक्रमण हटवितात व पुन्हा जैसे थे..च्या परिस्थितीमध्ये स्टॉल लावतात.

वाहतूक पोलिस शाखेच्या वतीने  वर्दळीच्या व सिग्नलच्या चौकांत वाहतूक पोलिस शिपाई बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. काही ठिकाणी हे वाहतूक पोलिस शिपाई वाहतूक कोंडी सुरुळीत करताना दिसतात, तर काही ठिकाणी एन्ट्री वसुली करताना किंवा काही चौकांत पावत्या बनविताना दिसतात.

रविवारी सायंकाळी आसरा चौकात झालेल्या अपघातामध्ये मोठी जीवितहानी टळली. यामध्ये आठ वर्षीय नंदिनीचा पाय मात्र गंभीर जखमी झाला आहे. ट्रकचालकास ताब्यात घेण्यात आले आहे. सिग्नल ओलांडताना भरधाव वेगात आलेल्या ट्रकचालकाने  दुचाकीस्वारास ठोकरले होते. दुसर्‍या बाजूस सिग्नलवर उभे असलेल्या नागरिकांनी ट्रकचालकास धरुन बदडले. चिमुरडीला ट्रकसमोरील चाकातून बाहेर काढून ताबडतोब खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.अनेकांनी आठ वर्षीय लहान मुलीला पाहून हळहळ व्यक्त केली. सुदैवाने मुलीचे प्राण वाचले.

एवढी मोठी घटना घडली, एका शाळकरी विद्यार्थिनीचा जीव जाता जाता वाचला. तरीही प्रशासन मूग गिळून गप्प आहे. सोमवारी सकाळी परिस्थिती जशीच्या तशी होती.सिग्नलवर नेहमीप्रमाणे गर्दीचा लोंढा होता. वाहतूक शाखेकडून एकच पोलिस शिपाई वाहतूक व्यवस्था सुरुळीत करण्यासाठी तैनात करण्यात आला होता. आसरा चौकातील अतिक्रमण नेहमीप्रमाणेच होते. बेशिस्त रिक्षाचालक नेहमीप्रमाणे चौकांत प्रवासी वाहतुकीसाठी थांबा घेत होते. वाहतूक पोलिस शिपाई नेहमीप्रमाणे पावत्या करण्यात मग्न होते.सिग्नलवर जाणारा गर्दीचा लोंढा येतच होता. वाहतूक कोंडी नेहमीप्रमाणेच होती.

त्रांगडे सिग्नलचे...
सोलापुरातील वाहतुकीला शिस्त लावणे म्हणजे अति विशेष काम. खाकी वर्दीतील ज्यांनी कुणी या विषयाला हात घातला त्याला याच सोलापूरकरांनी डोक्यावर घेतले, हा इतिहास आहे. डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांच्यापासून ते रविंद्र सेनगावकर या माजी पोलिस आयुक्‍तांनी बर्‍यापैकी या वाहतुकीला शिस्त लावली. परंतु गत काही महिन्यांपासून ये रे माझ्या मागल्या प्रमाणे ही वाहतुकीची शिस्त कुठेतरी बिघडतेय असे चित्र ठिकठिकाणच्या चौकात पाहायला मिळत आहे. त्यातूनच अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. याला कोण आणि कोणती यंत्रणा जबाबदार आहे याचा लेखाजोखा आजपासून...(त्रांगडे सिग्नलचे या माध्यमातून)

चौकात उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसाचे सिग्नल कोण तोडतोय, हे पाहण्याचे काम असताना याठिकाणी उपस्थित महाशय कर्मचारी पावत्या फाडण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पावत्या फाडणे महत्त्वाचे की सिग्नल व्यवस्था हेच कळून येत नव्हते.

पदपथावरील अतिक्रमणांना अभय कोणाचे?
आसरा चौकातील सिग्नल यंत्रणेजवळच चारही बाजूने मोठ्या प्रमाणात छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. याठिकाणी मोठे शॉपिंग सेंटर आहे. त्यामुळे नेहमीच येथे वर्दळ असते. अशा परिस्थितीत जेे पदपथ आहेत, त्यावर उभारलेल्या अतिक्रमणांना कुणाचे अभय आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिकेची अतिक्रमण हटाव यंत्रणा कारवाई करण्यासाठी कुणाची वाट पाहतेय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

रिक्षावाल्यांची मस्ती उतरविणार कोण?
आसरा चौकात विमानतळ, डीमार्ट, होटगी रोड, कुमठा नाका, नई जिंदगी या भागातून सेकंदाला कित्येक रिक्षा प्रवासी घेऊन दाखल होत असतात. या रिक्षांसाठी कुठेही थांबा नाही. तीन चाकी रिक्षांसाठी एक अधिकृत रिक्षा थांबा आहे. त्याठिकाणी शिस्तीत रिक्षा असतात, परंतु बाहेरुन येणार्‍या रिक्षा चौकातच थांबत असतात. त्यामुळे सातत्याने याठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे स्थानिक रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.