Wed, Sep 18, 2019 19:03होमपेज › Solapur › सोलापूरचा ‘हा’अशोक कामटेंना मानतो आदर्श

सोलापूरचा ‘हा’अशोक कामटेंना मानतो आदर्श

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर :  वेणुगोपाळ गाडी

26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी अशोक कामटे यांची आजही सोलापूकरांना तितक्याच प्रकर्षाने आठवण होते, मात्र त्यांना आदर्श मानून हुबेहूब त्यांच्यासारखी ठेवण असलेल्या अवलियाकडून कामटे यांची स्मृती जपण्याचे काम होत आहे.

पोलिस आयुक्त म्हणून कामटे यांची सोलापुरातील कारकीर्द संस्मरणीय राहील, यात शंका नाही. डॅशिंगपणे काम करून कामटे यांनी सोलापुरात पोलिस खात्याचा प्रचंड दबदबा निर्माण केला होता. यामुळे सारे सोलापूरकर त्यांचे फॅन बनले. 

श्रीनिवास यन्नम (कामटे) असे या अवलियाचे नाव. श्रीनिवास यन्नम हा प्रति कामटे म्हणून सोलापुरात गेल्या अनेक वर्षांपासून ओळखला जात आहे. शरीराचा रंग, डोके नेहमीच चमन यामुळे श्रीनिवास हा कामटे यांच्यासारखाच दिसतो. आपल्या वाहनावर कामटे यांची प्रतिमा व नाव ठेवल्याने श्रीनिवास हा नेहमीच चर्चेत असतो. एवढेच नव्हे तर त्याचे चक्क गॅझेटमध्ये आपल्या यन्नम हे आडनाव बदलून कामटे म्हणून नवीन नावाची नोंद करून आपले कामटे यांच्याविषयी प्रेम दाखवून दिले आहे. 

कामटे यांची डॅशिंग वृत्ती श्रीनिवासला आवडत असल्याने तोदेखील याच पद्धतीने काम करण्यात धन्यता मानतो. वृक्षसंवर्धन हे त्याचे आवडीचे काम. वृक्ष चळवळ रुजविण्याचे काम तो करीत आहे. अक्कलकोट पाणी टाकी ते विव्हको प्रोसेसच्या रस्ता दुभाजकातील झाडे जगविण्याचे काम करीत आहे. वृक्षाची बेकायदेशीर कत्तल कोणी केली तर त्याविषयी मनपा, पोलिसांकडे तक्रार करण्याकामी तो अग्रेसर असतो. अनेक सामाजिक प्रश्‍नांना वाचा फोडून त्याचे निवारणासाठी प्रयत्न करत असतो.