Fri, Apr 26, 2019 09:27होमपेज › Solapur › पोलिसाच्या घरातच मिळाले 2 लाख, लुटीचा बनाव केल्याचा संशय

पोलिसाच्या घरातच मिळाले 2 लाख, लुटीचा बनाव केल्याचा संशय

Published On: Mar 20 2018 7:42PM | Last Updated: Mar 20 2018 7:42PMसोलापूर : प्रतिनिधी

लुटीप्रकरणी  फिर्यादी  सहायक  फौजदार  मारूती  लक्ष्मण  राजमाने (वय 56, रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) यांच्या घरातच दोन लाख रुपयांची रोकड मिळाली आहे. ही रक्कम कोठून आणली याचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेचा जोडभावी पेठ व शहर गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरु आहे.

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अशोक चौकातील सोलापूर शहर पोलिसांच्या पेट्रोल पंपावरील इनजार्च सहायक फौजदार मारूती राजमाने हे पेट्रोल पंपावर जमा झालेली 5 लाख रुपयांची रोकड घेऊन जाताना अज्ञात सहा जणांच्या टोळीने त्यांना मारहाण करुन ती रोकड लुटून नेल्याबाबत सुरुवातीला जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन  नंतर तो जोडभावी पेठ पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. 

पोलिसांचीच लाखोंची रोकड लुटल्यामुळे पोलिस आयुक्तांपासून सर्वच पोलिस अधिकार्‍यांनी हे प्रकरण चांगलेच गांभीर्याने घेऊन याचा तपास सुरु केला आहे.  परंतु, फिर्यादी राजमाने यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी तीन वेळा घटनास्थळ बदलले आहे. त्यामुळे एका पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा दुसर्‍या पोलिस ठाण्यात वर्ग करावा लागला. घटनेच्या रात्री वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी राजमाने याच्यावर प्रश्‍नांचा भडीमार करुन चौकशी केल्यावर राजमाने याच्या घरातून सुमारे दोन लाखांची रोकड मिळाली. ही रोकड कोणाची व कशी आली याचा तपास पोलिस यंत्रणा करीत आहेत. या रकमेतील काही रक्कम ही पेट्रोल पंपाचा भरणाच असल्याचेही सांगण्यात येते. याबाबतचा खुलासा पोलिसांच्या तपासामध्ये होणार आहे. 

राजमाने याच्या वैद्यकीय तपासणीमध्येही काहीही निघाले नाही. राजमाने याच्या डोळ्यात काहीही टाकण्यात आलेले नव्हते हे वैद्यकीय तपासणीमध्ये निघाले असून पोलिसांनी राजमाने याने सांगितलेल्या रस्त्यावर असणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे चित्रीकरण पाहिले आहे. या चित्रीकरणामध्येही काहीही सापडले नसून राजमाने या रस्त्यावरुन गेलाच नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास करताना फिर्यादीवरच संशय व्यक्त करण्यात येत आहे.

 

tags : solapur,solapur news, ashok chowk police petrol pump cash looted issue, 2 lack cash found, Prosecutor assistant police officer maruti rajmane house, doubt of fraud loot complaint