Sat, Mar 23, 2019 16:24होमपेज › Solapur › दिलीप माने यांनी बाजार समितीचा कळस चढविला : काका साठे

दिलीप माने यांनी बाजार समितीचा कळस चढविला : काका साठे

Published On: Jun 29 2018 11:41PM | Last Updated: Jun 29 2018 11:41PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे  तत्कालिन नेते कै. बाबुराव चाकोते, कै. वि.गु.शिवदारे यासारख्या  नेत्यांनी शेतकर्‍यांसाठी बाजार समितीचे मंदिर उभे करण्याचे काम केले. कै. ब्रह्मदेवदादा माने व त्यांच्या पुढे माजी आमदार दिलीप माने यांनी या समितीच्या विकासाकरिता कळस चढविण्याचे काम केले असल्याचे मत जि.प. विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे यांनी व्यक्‍त केले. 

बाजार समितीचे उमेदवार प्रकाश चौरेकर यांच्या प्रचारार्थ उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्‍नज येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत साठे यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर दिलीप माने, प्रल्हाद काशीद, मनोहर चेंडके, मनोहर जगताप, विश्‍वजित भोसले, शिवाजी नन्‍नवरे, सुधीर गोरे, नंदकुमार गवळी, जितेंद्र साठे, सरपंच वैजिनाथ भोसले, दगडू भोसले, सुनील भोसले, जितेंद्र शिलवंत आदी उपस्थित होते. 

यावेळी साठे म्हणाले, बाजार समितीचा कारभार देशात दोन नंबर क्रमांकावर माने यांनी आणला. सहकारमंत्री यांनी बाजार समितीची सत्ता काबीज करण्यासाठी सुडाचे राजकारण केले. यासाठी 39 कोटींचा कथित घोटाळा समोर आणून त्रास दिला. निवडणूक काळात माने यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना बाहेर ठेवून निवडणुका जिंकण्याचा सहकारमंत्र्यांचा डाव आता फसला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात पैसे वाटप करण्याची पध्दत त्यांनी सुरु केली आहे. यापुढील काळात उत्तर सोलापूर तालुक्यात भाजपसोबत कधीही जाणार नसून काँग्रेस व राष्ट्रवादी अशीच युती राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दिलीप माने म्हणाले, पाच वर्षांच्या काळात कारभार करताना एकाही ऑडिटरने चूक काढून त्याची पूर्तता करण्यास सांगितले नाही. मात्र सत्तेसाठी सहकारमंत्री चुकीचे आरोप करुन सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांना न घाबरणारे आता घाबरल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

बियाण्यांची नव्हे पैशांची होतेय पेरणी : चौरेकर

शेतकरी आपल्या शेतात बियाण्यांची पेरणी करुन, त्याची वाढ करुन पीक काढतात. उत्तर सोलापूर तालुक्यात मात्र विरोधकांकडून  निवडणुकीसाठी पैशांची पेरणी होत आहे. शेतकरी उभा राहण्यासाठी दिलीप माने यांनी काढलेल्या सहकारी संस्था बरखास्त करुन शेतकर्‍यांचे नुकसान सहकारमंत्री यांनी केले असल्याचा आरोप यावेळी उमेदवार प्रकाश चौरेकर यांनी केला.