Wed, Apr 24, 2019 15:50होमपेज › Solapur › सोलापूर बाजार समिती निवडणुकीमुळे शेकडोंना ‘प्रॉपर्टी’ची लॉटरी 

सोलापूर बाजार समिती निवडणुकीमुळे शेकडोंना ‘प्रॉपर्टी’ची लॉटरी 

Published On: Jul 01 2018 12:11AM | Last Updated: Jun 30 2018 11:22PMसोलापूर : वेणुगोपाळ गाडी

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमुळे  शेकडोजणांना आपल्या किंवा कुटुंबियांच्या नावे शेतजमीन असल्याची माहिती समजली असून त्यांच्यादृष्टीने ही एकप्रकारे ‘लॉटरी’च आहे. या समितीच्या निवडणुकीत कोण विजयी होवो अथवा न होवो पण ही निवडणूक शेकडोजणांच्या पथ्यावर पडल्याचे मानले जात आहे.

नवीन कायद्यानुसार बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकर्‍यांना प्रथमच मतदानाची संधी लाभली आहे. त्यामुळे या समितीच्या निवडणुकीला यंदा वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक मंत्र्यांसह अनेक राजकीय दिग्गज उभे असल्याने या निवडणुकीला एकप्रकारे राजकीय स्वरुप आले आहे. या कारणामुळे तसेच नवीन कायद्यामुळेदेखील ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. ज्यांच्या नावे शेतजमिनीचा सात-बारा उतारा आहे अशांना या निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार आहे. 

या निवडणुकीच्या निमित्ताने शेकडोजणांच्या नावे शेतजमिनी असल्याची बाब उघड झाली असून अशांना किंवा त्यांच्या कुटुंबांशी संबंधितांना ही बाब माहीत नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. 

या निवडणुकीतील तीनही पॅनलकडून मतदानाच्या स्लिपा वाटप करण्यात येत आहेत. शेतकरी मतदार यादीनुसार स्लिपा तयार करुन वाटण्याचे काम सुरु असताना हा प्रकार उघेडात आला आहे. असे बहुतांशी मतदार हे शहरी भागात वास्तव्यास असून त्यांच्या वाडवडील वा पूर्वजांनी एकेकाळी घेतलेल्या शेतजमिनीबद्दल ते अनभिज्ञ होते. पॅनलचे कार्यकर्ते आडनावाच्या आधारे ओळखी-पाळखी काढून स्लिपा वाटत आहेत. ज्यांना आपल्या पूर्वजांनी घेतलेल्या शेतजमिनीबद्दल माहिती नव्हती, अशांसाठी एकप्रकारे लॉटरीच आहे. 

एकंदर या ‘अनभिज्ञ प्रॉपर्टी’मुळे अनेकांना लॉटरी लागल्याने अशा कुटुंबांशी संबंधित मंडळी सध्या प्रचंड आनंदी झाली आहेत. ही बाब सुखावह असली तरी दुसरीकडे या प्रॉपर्टी वाटपावरुन वाददेखील निर्माण होणार आहेत. 

एकट्या कुंभारी गणात 20 कुटुंबांच्या  प्रॉपर्टी उजेडात आल्या आहेत. दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गणांचा विचार करता ही संख्या शेकडोंवर असल्याचे सांगण्यात येते. बाजार समितीच्या निवडणुकीमुळे अनेकांना ‘धन’ नव्हे तर ‘जमीन’ लाभ झाला आणि ते यामुळे ‘मालामाल’ होणार आहेत. या आगळ्यावेगळ्या ‘लॉटरी’ची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

एका कुटुंबाला चक्‍क 70 एकरची लॉटरी 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीमुळे अनभिज्ञ असलेल्या अनेक प्रॉपर्टीज उजेडात आल्या व येत आहेत. अनेक गुंठे जमिनी आपल्या पूर्वज वा कुटुंबियांच्या नावावर असल्याचे समजल्याने अनेकांची चांदी झाली आहे.  पूर्व भागातील एका कुटुंबाला या निवडणुकीमुळे 70 एकर जमिनीचा लाभ झाला आहे. या बंपर लॉटरीमुळे या कुटुंबियाचा आनंद गगनात मावेना अशी स्थिती आहे. एकट्या कुंभारी गणात 20 कुटुंबांच्या  प्रॉपर्टी उजेडात आल्या आहेत. दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गणांचा विचार करता ही संख्या शेकडोंवर असल्याचे सांगण्यात येते.