Sun, May 26, 2019 08:57होमपेज › Solapur › ‘येडं पेरलं अन् खुळंच उगवलं’

‘येडं पेरलं अन् खुळंच उगवलं’

Published On: Jul 05 2018 1:41AM | Last Updated: Jul 04 2018 8:47PMसोलापूर : संतोष आचलारे 

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकर्‍यांना ज्यांनी मतदानाचा अधिकार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेतली त्या सहकारमंत्री सुभाष देशमुखांंच्या पॅनेलचा निवडणुकीत झालेला दारुण पराभव आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. या निवडणुकीत बाजार समितीची सत्ता काबीज करण्यासाठी सहकारमंत्र्यांनी दर्जेदार बियाण्यांची पेरणी करणे आवश्यक असताना त्यांची अवस्था ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’, अशीच झाल्याचे चित्र आहे. 

सहकारमंत्री यांच्या अत्यंत निकटवर्तीय असणारे इंद्रजित पवार यांचा पराभव अत्यंत धक्‍कादायक आहे. सहकारमंत्री स्वत:ला सातत्याने मी खेडूत, मी अडाणी, मला काय कळतंय, असे सातत्याने संबोधून समोरच्याचे माप काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांची हीच भूमिका  त्यांच्यासाठी या निवडणुकीत अडचणीची ठरली आहे. प्रशासक नेमून सहकारमंत्री देशमुख यांनी दोन वर्षांपासून बाजार समितीवर आपली पकड ठेवली होती. दीड वर्षापूर्वी काँग्रेसच्या अंतर्गत वादातून बाजार समितीच्या गैरप्रकाराची तक्रार तत्कालीन माजी सभापती राजशेखर शिवदारे व सुरेश हसापुरे यांनी केली होती. या तक्रारीवर सहकारमंत्र्यांनी त्याचवेळी कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात शिवदारे  व हसापुरे  यांची  ढाल पुढे करून त्यांनी केलेली कारवाई ही स्पष्टपणे राजकीय खेळीचा भाग असल्याचे मतदारांना दिसून आले.  मतदानाच्या दिवशी जिल्हा बँक व बाजार समितीचे कामकाज चालू ठेवण्याचा त्यांंचा निर्णयही अंगलट आला आहे. मतदानाच्या दिवशी श्री सिद्धेेश्‍वर मंदिरात दर्शन घेऊन त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांनी विशिष्ट मतदानाचा गठ्ठा आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा धूर्त प्रयत्नही अपयशीच ठरला. सहकारमंत्र्यांविरोधात काँग्रेस, सेना व राष्ट्रवादी यासारख्या प्रमुख पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांची मोट बांधून निवडणुकीत राजकीय चाल चालण्यात माने यांनी  भूमिगत असतानाही यश मिळवले. याउलट निवडणूक असतानाही इगो दाखवून भाजपमधीलच गट तोडण्याचे काम सहकारमंत्र्यांकडून झाले. ऐन निवडणुकीच्या काळात पालकमंत्री गटाचे रबर त्यांनी अधिक ताणून धरल्याने अखेर ते तुटले व त्याचे भोग त्यांच्या पदरी पडले. 

बाजार समितीच्या आवारात हमीभावाने धान्यांची खरेदी करण्यासाठी अत्यंत उशिराने केंद्र सुरु करण्यात आले. शिवाय शेतकर्‍यांना वेळेत धान्याची रक्‍कम देण्यात आली नाही. ‘गरजवंतास अक्‍कल नसते’ याप्रमाणे अनेक शेतकर्‍यांनी हमीभाव असतानाही कवडीमोल दराने शेतमाल गत वर्षभरात विकला. त्याची स्पष्ट नाराजी मतपेटीतून बाहेर पडली आहे. ऊस बिलाबाबतीतही तीच परिस्थिती असल्याने चोहोबाजूने सहकारमंत्री यांची या निवडणुकीत कोंडी झाल्याचे स्पष्ट दिसून आले.  ऐन निवडणुकीत माने गटातील उमेदवारांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचे सूडाचे राजकारण मतदारांना फारसे रुचले नाही. न्यायालयीन लढाईत सहकारमंत्र्यांनी विरोधात माने यांच्या बाजूने कौल मिळत गेल्याने 39 कोटींचे प्रकरण हे केवळ गुंतविण्यासाठीच होते, अशी भावना मतदारांत झाली.  

निवडणूक सुरू असताना प्रचार सभेत सहकारमंत्री देशमुख यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शरद पवार यांना घाबरत नसल्याचे वक्‍तव्य केले. शिवाय प्रत्येकाची औलाद काढली.  घरादारावर नांगर फिरविण्याची भाषा केली. या सर्व घटनांचा एकत्रित विपरित परिणाम त्यांना भोगावा लागला. मंत्री झाल्यापासून लोकमंगल परिवारातील सदस्यांना अनेक पदे त्यांनी अर्पण केल्याने  याचाही  विपरित   परिणाम झाला. न्यायालयाच्या आदेशानंतर मतदानाच्या दोन दिवस आधी बाहेर पडलेले माने यांनी सहकारमंत्र्यांविरोधात तोफ डागून राजकारण काय असते हे मी दाखवितो, असे सांगितले होते. अखेर त्यांनी  सहकारमंत्र्यांना राजकारण काय असते ते दाखवून दिलेच, अशीच प्रतिक्रिया निकालानंतर उमटत आहे. कंदलगाव व होटगी या गणांत आलेले  सहकारमंत्र्यांचे दोन उमेदवारही  स्वत:च्या हिमतीवर निवडून आल्याचे बोलले जात असल्याने सहकारमंत्र्यांसाठी ही आणखीनच नामुष्की आहे.