Tue, Aug 20, 2019 04:10होमपेज › Solapur › सहकारमहर्षी पुरस्कारांची घोषणा

सहकारमहर्षी पुरस्कारांची घोषणा

Published On: Mar 12 2018 10:41PM | Last Updated: Mar 12 2018 10:18PM सोलापूर : महेश पांढरे

राज्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असलेल्या सहकारी संस्थांना ‘सहकारमहर्षी सहकारभूषण’ आणि ‘सहकारनिष्ठ’ पुरस्काराने गौरविण्यात येते. हे पुरस्कार राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले असून लवकरच या संस्थांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात येणार आहे.

प्राथमिक दूध उत्पादक संस्था, कुक्कुटपालन संस्था, मत्स्यपालन संस्था व पशुसंवर्धन संस्था या गटांत उत्कृष्ट काम करणार्‍या संस्थांना कै. शंकरराव मोहिते-पाटील सहकारभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येते. यंदा पुणे विभागातून दोन उत्पादक संस्थांना समान गुण मिळाले असल्याने हा पुरस्कार श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्था, घोटवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) आणि भोगावती सहकारी दूध व्यावसायिक संस्था (सडोली, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांना प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. शुक्लेश्‍वर दूध उत्पादक सहकारी संस्था, सुकेवाडी (ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांना द्वितीय, तर इटियाडोह जलाशय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, रामनगर (ता. अर्जुनीमोर, जि. गोंदिया) यांना तृतीय क्रमांक मिळाला आहेे. सहकारनिष्ठ पुरस्कारांची घोषणा ही लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्याचे संपूर्ण अधिकार सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना देण्यात आले आहेत. यासाठी रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्रक देऊन यशस्वी सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार आहे.