Mon, Apr 22, 2019 03:43होमपेज › Solapur › पॅनेलची अद्यापही संभ्रमावस्था 

पॅनेलची अद्यापही संभ्रमावस्था 

Published On: Jun 18 2018 10:45PM | Last Updated: Jun 18 2018 8:52PMसोलापूर : संतोष आचलारे   

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समिती निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ 12 दिवस शिल्‍लक उरले असताना अजूनही रिंगणातील पॅनेलची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना  यासारख्या महत्त्वाच्या पक्षांतील नेते, कार्यकर्ते कोणत्याही पक्षातील नेत्यांशी हातमिळवणी करीत असल्याने विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केवळ कुंभारी मतदारसंघातून वैयक्‍तिक निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने त्यांच्या निवडणुकीतील शीतयुद्धाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

राज्यातील अग्रेसर असणार्‍या सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीत आतापर्यंत स्थापनेपासून काँग्रेसची एकहाती सत्ता  होती. सुमारे दीड वर्षांपासून या बाजार समितीवर प्रशासक नेमून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सत्तेवरवचक ठेवल्याचे दिसून येते. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकर्‍यांना पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार देण्यात आला. बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या गैरप्रकारांवरून गुन्हे दाखल करून या संचालकांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. 
माजी आमदार दिलीप माने यांच्यावरील सर्व संकटे तूर्त बाजूला झाल्याने त्यांनी आता पूर्ण ताकदीने निवडणुकीसाठी संघर्ष सुरू केला आहे. रविवारी त्यांनी कार्यकर्त्यांची मेळावा घेत थेट सहकारमंत्री देशमुख यांना टागर्ेंट करून रणशिंग फुकले. त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल होणार, हे नक्‍की असले तरी त्यांच्या पॅनेलमधील उमेदवार नेमके कोण आहेत, याची माहिती अजूनही समोर आली नाही. 

सहकारमंत्री देशमुख यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी हातमिळवणी करून पॅनेल उभे करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र दोन्ही देशमुखांतील अंतर्गत वादामुळे भाजपचे पॅनेल या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली होणे अशक्य झाले आहे. 

त्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनाच आता कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करून भाजप म्हणून निवडणूक लढविण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेत भाजपसोबत मैत्री केलेले राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांचीही साथ सहकारमंत्री गटाला मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना अशा प्रमुख पक्षांतील नाराज कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दक्षिण सोलापूर राष्ट्रवादीचे युवानेते बसवराज बगले यांनी नाराज उमेदवारांना एकत्रित करून निवडणुकीत तिसरे स्वतंत्र पॅनेल उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र पालकमंत्री, सहकारमंत्री व माजी आमदार माने यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधील उमेदवार अजूनही निश्‍चित झाले नसल्याने या पॅनेलकडे इच्छुकांची संख्या सध्या तरी कमी असल्याचे दिसून येते.