Thu, Jun 20, 2019 21:47होमपेज › Solapur › कृषी महोत्सवात शेती व तंत्रज्ञानाची सांगड  

कृषी महोत्सवात शेती व तंत्रज्ञानाची सांगड  

Published On: Mar 12 2018 10:41PM | Last Updated: Mar 12 2018 10:15PMसोलापूर : प्रतिनिधी 

येथील होम मैदानावर सुरू असलेल्या कृषी महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांबाबत याठिकाणी लावण्यात आलेले स्टॉल्स गर्दी खेचत आहेत. शेती व तंत्रज्ञान याची सांगड घालणारे नवनवे प्रयोग महोत्सवात पाहायला मिळत आहेत. या स्टॉल्सना शेतकरी व ग्राहक यांचा ओढा वाढत आहे.

केक असो किंवा कुकीज हे तसे विदेशी पदार्थ.  भारतीयांना या पदार्थांची ओळख इंग्रजांमार्फतच झाली. मात्र  तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीयांनी यामध्ये विविध प्रकारचे संशोधन केले आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ज्वारीचा केक आणि डाळिंबाचे कुकीज.सोलापूरला महाराष्ट्राचे ज्वारीचे कोठार असे म्हणतात. मालदांडी ज्वारीला जीआय मानांकन प्राप्त आहे. ज्वारीपासून भाकरी आणि फार तर हुरडा मिळतो असाच आपला समज होता. मात्र कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन करून ज्वारीचा केक बनवण्यापर्यंत मजल मारली आहे. याबाबत कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शास्त्रज्ञ अनिता शेळके यांनी सांगितले की, ज्वारीचा वापर करून रवा, इडली, लाडू, चकली व केक यासारखी अनेक उत्पादने तयार करता येऊ शकतात. ज्वारीपासून केक बनवण्याचे संशोधन एक महत्त्वाचे संशोधन म्हणून ओळखले जाईल. केक बनवण्यासाठी ज्वारीचे पीठ व बेकिंग पावडर चाळून मिक्सरमध्ये टाकली जाते. त्यात दूध, तूप व साखर टाकून त्याचे मिश्रण केले जाते. हे मिश्रण ओव्हनमध्ये 200 डिग्री तापमानाला 15 ते 20 मिनिटे बेक केल्यास केक तयार होतो. त्यावर आवश्यकतेप्रमाणे क्रीम लावू शकतो अथवा क्रीमशिवाय कप केक म्हणूनही याचा वापर करता येऊ शकतो. यामध्ये मँगो, पायनापल किंवा चॉकलेट फ्लेवर बनवता येऊ शकतात, अशी माहिती अनिता शेळके यांनी दिली. याचप्रकारे डाळिंबावर संशोधन करून डाळिंबापासून बिस्किटे (कुकीज) तयार करण्याची किमया राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी साधली आहे. डाळिंबाचे गर व दाणे वेगळे केले जातात. गराचा वापर ज्यूस तयार करण्यासाठी केला जातो, तर दाण्यांमधील तेल काढून घेतले जाते. 

यानंतर उरलेला चोथा कुकीज तयार करण्यासाठी वापरला जातो. हे डाळिंबापासून बनवलेले बिस्किट फायबर रिच असतात. 45 वर्षांपुढील व्यक्तींना या बिस्किटाचा चांगला उपयोग होतो, अशी माहिती राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे तांत्रिक अधिकारी दिनकर चौधरी यांनी दिली. अशा पद्धतीने शेती क्षेत्रात विविध संशोधनांतून वेगवेगळे प्रयोग करणार्‍या शेतकरी व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शासकीय संस्थांनी कृषी महोत्सवात आपले स्टॉल लावले आहेत. या सर्व स्टॉल्सना भेट देऊन नवनवीन माहिती मिळवण्याची संधी नागरिकांना आहे. असे प्रयोग आपल्या शेतात केल्यास तुमचे उत्पन वाढणार, हे मात्र नक्की.