Wed, Apr 24, 2019 16:05होमपेज › Solapur › बाजार समितीमधील अडतदार कामगारांच्या हुल्‍लडबाजीने संतप्‍त

बाजार समितीमधील अडतदार कामगारांच्या हुल्‍लडबाजीने संतप्‍त

Published On: Jan 31 2018 2:07AM | Last Updated: Jan 30 2018 9:18PMसोलापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या धोरणाविरोधात मंगळवारी सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीत हमाल, मापाडी कामगार संघटनेच्यावतीने संप पुकारण्यात आला होता. यावेळी सकाळी काही हमालांनी 
हुल्‍लडबाजी करीत अडतदारांचे दुकान बंद करण्याचा प्रयत्न केल्याने याविरोधात संतप्‍त अडतदारांनी एकत्रित होत बाजार समितीचे सचिव मोहनराव निंबाळकर यांची भेट घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. 

सोलापूर बाजार समिती राज्यातील एक  नामांकित समिती आहे. रोज या समितीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. अडतदार, व्यापारी व हमालांचे हितसंबंध आतापर्यंत याठिकाणी चांगले दिसून आले आहेत. मात्र मंगळवारी पुकारण्यात आलेल्या 

संपादरम्यान काही नवीन अतिउत्साही कामगारांनी व्यापार्‍यांना व अडतदारांना दमबाजी करीत हुल्‍लडबाजी करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे व्यापारी आश्‍चर्यचकित होत थेट बाजार समितीचे सचिव यांची भेट घेऊन त्यांनी हा प्रकार कानावर घातला. 

अडतदार व हमालांचे संबध अत्यंत चांगले आहेत. मात्र मंगळवारचा प्रकार आमच्यासाठी नवीन होता. अलीकडच्या काही दिवसांत बाहेरुन आलेल्या हमालांकडून सातत्याने दमबाजीचा प्रकार होत असल्याने त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका यावेळी व्यापार्‍यांनी घेतली. या प्रकाराची चौकशी करून दोन दिवसांत संबंधितांना समज देण्यात येईल, त्यात सुधारणा न झाल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सचिव निंबाळकर यांनी अडतदारांना दिली. दरम्यान, या प्रकाराची माहिती देण्यास बाजार समितीचे प्रशासन व अडतदारांनी नकार दिला. हा आमचा अंतर्गत विषय आहे. आम्ही तो मिटवू, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित असणार्‍यांनी दिली.