होमपेज › Solapur › कृषी प्रदर्शनात सोलापुरी चादर अन् टॉवेलही!

कृषी प्रदर्शनात सोलापुरी चादर अन् टॉवेलही!

Published On: Mar 12 2018 10:41PM | Last Updated: Mar 12 2018 9:12PMसोलापूर : प्रतिनिधी 

राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सोलापूरच्या होम मैदानावर आयोजित कृषी प्रदर्शनात कृषिसंबंधित विविध उत्पादनांबरोबरच कापसापासून तयार होणार्‍या हातमाग-यंत्रमागावरील अनेक उत्पादनेदेखील विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. सोलापुरी चादर-टॉवेल्स आदींचा यामध्ये समावेश आहे.

रविवारी या प्रदर्शनास सुरुवात झाली असून हे प्रदर्शन पाच दिवस चालणार आहे. या प्रदर्शनात सुमारे 150 स्टॉल्स आहेत. कृषिसंबंधित अनेक उत्पादनांची या प्रदर्शनात रेलचेल आहे.  कृषी क्षेत्र प्रामुख्याने ग्रामीण भागाशी संबंधित असल्याने या भागातील अनेक उत्पादनांबरोबर सोलापूर शहरातील हातामाग-यंत्रमाग उद्योगात तयार होणारी उत्पादने या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. कापसापासून अनेक वस्त्रे विणण्यात येतात. सोलापूरच्या वस्त्रोद्योगात अनेक उत्पादने घेतली जातात.  यामध्ये प्रामुख्याने सोलापुरी चादर, टेरीटॉवेल, सतरंजी, बेडशीट, नॅपकिन, प्लेन टॉवेल आदींचा समावेश आहे. या विविध उत्पादनांसह नॅपकिन बुके आदी गिफ्ट  आयटम्सदेखील प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.

जिल्हा यंत्रमागधारक संघाच्या बॅनरखाली हा स्टॉल थाटण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी विविध स्टॉल्सबरोबरच याही स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. जिल्हा यंत्रमागधारक संघाचे सहखजिनदार अंबादास बिंगी यांनी यावेळी यंत्रमागावरील उत्पादनांची माहिती जिल्हाधिकार्‍यांना दिली. बिंगी यांच्यासह राजू राठी, ईरय्या गड्डम, मल्लिकार्जुन कमटम, नरसय्या वडनाल, शंकर गुंडला, अनंतूल, संभारम आदी यंत्रमागधारकांनी आपली उत्पादने या प्रदर्शनात ठेवली आहेत.