Tue, Jul 23, 2019 18:48होमपेज › Solapur › कर्मचारी कपात धोरणाविरोधात ११ डिसेंबर रोजी आंदोलन 

कर्मचारी कपात धोरणाविरोधात ११ डिसेंबर रोजी आंदोलन 

Published On: Dec 07 2017 1:30AM | Last Updated: Dec 06 2017 9:02PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या कर्मचारी कपातीच्या धोरणाविरोधात व अन्य मागण्यांबाबत जि.प. कर्मचारी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेत 11 डिसेंबर रोजी काळ्या फिती लावून कामकाज करणार असल्याची माहिती जि.प. कर्मचारी युनियनचे राज्याचे सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी दिली. 

जि.प. कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्‍नांबाबत राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. प्रलंबित असलेल्या मागण्या सोडविण्यासाठी शासनाकडून वेळकाढूपणाची भूमिका घेण्यात येत आहे. अशातच पुन्हा 30 टक्के कर्मचारी कपातीचे धोरण घेण्यात येत असल्याने जि.प. कर्मचार्‍यांत असंतोष पसरला आहे. 

राज्य शासनाच्या या धोरणाविरुध्द  11 डिसेंबर रोजी सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयांसमोर निदर्शन करुन व दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज करुन राज्य शासनाचा निषेध करण्यात येत आहे. या आंदोलनाची पूर्वकल्पना मुख्यमंत्री, अर्थमंत्री, ग्रामविकासमंत्री व प्रधान सचिव यांना देण्यात आली आहे. 

कर्मचारी कपातीचे धोरण रद्द करुन आवश्यक त्याठिकाणी सरळसेवेने भरती करण्यात यावी, वेतनत्रुटीचा अहवाल अर्थ खात्याकडे सादर करण्यात यावा, सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, अनुकंपा भरतीमधील टक्केवारीची अट शिथील करण्यात यावी, सेवानिवृत्तीचे वय 60 करण्यात यावे, जुनी पेन्शन योजना सुरु करण्यात यावी आदींसह 16 मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनात जि.प. कर्मचार्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लिंगराज यांनी केले आहे. 

केंद्र स्तरावर शासनाच्यावतीने कर्मचारी कपातीचे धोरण राबवले जात आहे. त्याचेच अनुकरण राज्यातदेखील केले जात आहे. मागील काही वर्षांपासून सातत्याने खासगीकरण करुन नोकर्‍यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे नोकर्‍या नसल्याने बेकारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. ही वाढ रोखण्यासाठी नोकर्‍या वाढवणे गरजेचे असताना उलट शासनाकडून नोकर कपातीचे धोरण राबवले जात असल्याने नोकरदार वर्गामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्याचे पडसाद उमटत आहेत.