Fri, Jul 19, 2019 18:05होमपेज › Solapur › अंगणवाडी ताईंचा ऐन उन्हात छत्री मोर्चा

अंगणवाडी ताईंचा ऐन उन्हात छत्री मोर्चा

Published On: Feb 27 2018 8:21AM | Last Updated: Feb 26 2018 9:03PMसोलापूर : प्रतिनिधी 

अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधन वाढीसाठी केंद्र शासनाने बजेटमध्ये स्वतंत्र तरतूद करून मानधन वाढवावे, राज्य शासनाने दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे मानधन वाढ व भाऊबीज भेट निधी तातडीने देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने हजारो अंगणवाडी ताईंनी ऐन उन्हात डोक्यावर छत्री धरून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. 

सकाळी अकरा वाजता पार्क चौकातील चार हुतात्मांच्या पुतळ्यास अभिवादन करून छत्री मोर्चास प्रारंभ करण्यात आला. पार्क चौक, सिद्धेश्‍वर मंदिर आदी मार्गाने डोक्यावर छत्री घेत हजारो अंगणवाडीसेविकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा आणला. या मोर्चाने सर्व नागरिक, प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेतले. राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, सरचिटणीस सरला चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे रुपातंतर जिल्हा परिषदेसमोर सभेत झाले. यावेळी अंगणवाडीसेविकांनी आपल्या भाषणातून राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला.अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्याकडून अनेक कामे अत्यंत कमी व केवळ मानधनावर करुन घेण्यात येतात. मानधनवाढीसाठी अनेकदा आंदोलन केल्यानंतरही शासनाची संवेदना याबाबत बधीर असल्याने शासनावर यावेळी टीका करण्यात आली. सभेनंतर जिल्हाधिकारी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 6 डिसेंबर 2017 रोजी मुख्यमंत्री, महिला व बालविकासमंत्री यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार मानधनवाढीचा व भाऊबीज भेटीचा शासकीय आदेश काढण्यात यावा, 1 ऑक्टोबर 2017 पासून सेविकांना दीड हजार व अधिक दहा टक्के वाढ ज्येष्ठतेनुसार मानधव वाढ करण्यात यावी, पोषण आहारासाठी प्रलुंबत असलेला निधी तातडीने देण्यात यावा, प्रति लाभार्थी सहा रुपयांप्रमाणे अनुदान देण्यात यावे, अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्या  सेवालाभाच्या रक्कमेत वाढ करुन सेवेनुसार देण्यात यावे आदींसह 21 विविध मागण्या यावेळी राज्य शासनापुढे उपस्थित करण्यात आले. आंदोलनात कांचन पांढरे, हेमा गव्हाणे, शारदा वाघमारे, अनिता सावस्कर, विमल गवळी, सुलभा कुलकर्णी, चंदा पसलेलू, प्रमिला माळी आदींसह सर्व तालुक्यातील सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.