Mon, May 27, 2019 01:22होमपेज › Solapur › लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, आरटीओ आणि पोलिस खात्याची उदासिनता

लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, आरटीओ आणि पोलिस खात्याची उदासिनता

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 06 2018 9:23PMसोलापूर : प्रतिनिधी

शहरातून होणार्‍या अवजड वाहतुकीच्या अपघातांमध्ये सातत्याने होणारी वाढ आणि बळी पडणार्‍यांची संख्या पाहिल्यानंतर पहाटे 6 ते रात्री 10 याकालावधीत शहरातून जाणारी अवजड वाहतूक बंदच व्हावी या मागणीचा जोर आता जनतेतूनच  वाढत आहे. सोलापूरच्या सुजाण नागरिकांनी जड वाहतूक नागरी कृती समितीची स्थापना करुन शहरातील जड वाहतूक दिवसा बंदीसाठी आंदोलनाचा तीव्र लढा उभारला असून लोकप्रतिनिधींनीदेखील जनतेच्या या लढ्यात उडी घेत समर्थन दिले आहे. दिवसाची जड वाहतूक बंदीसाठी शहरातील दहा लाख लोकसंख्येपैकी लाखो लोकांच्या स्वाक्षर्‍या निवेदनावर होतात. याचा अर्थ बहुसंख्य लोकांची ही मागणी आहे. इतक्या मोठ्या संख्येने जड वाहतूक दिवसा बंदीसाठी जनमताचा रेटा असतानाही शासन, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, आरटीओ, पोलिस खात्याकडून जनमताला गांभीर्याने घेतले जात नसल्याची शोकांतिका जनतेतूनच व्यक्त होत आहे.

शहरातून दिवसा होणारी जड वाहतूक बंद व्हावी या मागणीसाठी सोलापूरकरांनी यापूर्वी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. परंतु जड वाहतूक काही बंद झालेली नाही. शहरातून जाणारी जड वाहतूक सकाळी 7 वाजता बंद होते. दुपारी 1 ते 3 याकाळात शिथील असून या दोन तासांत जड वाहतूक सुरु असते. रात्री 8 वाजता जड  वाहतूक पुन्हा सुरु होते. परंतु प्रत्यक्षात शहरातील वाढलेली रहदारी पाहता शहरातून जाणारी जड वाहतूक ही पहाटे 6 ते रात्री 10 याकालावधीत बंद असणेच गरजेचे आहे. कारण सकाळी 7 च्या सुमारास शाळा, महाविद्यालयांत जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते.  दुपारी 1 ते 3  यावेळेतदेखील रहदारी या मार्गावर वाढलेली आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास क्लासेस सुटण्याची वेळ असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ मोठी असते. दुपारच्या वेळी जड वाहतूक बंदी शिथील न्यायालयाच्या आदेशाने झाल्याचे सांगण्यात येते. सध्याची या मार्गावरील वाढलेली वाहतूक आणि वाढलेले अपघात याची परिस्थिती पुन्हा एकदा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचे काम कृती समितीने करण्याची गरज आहे. पोलिस खात्यानेदेखील संवेदनशीलता दाखवत प्रसंगी न्यायालयात जाऊन हा प्रश्‍न सोडविण्याची गरज आहे. मोटार मालक व चालक वाहतूकदार संघटनेनेदेखील अपघातात बळी पडणार्‍यांची संख्या लक्षात घेऊन सहकार्य करण्याची गरज आहे.