Tue, Apr 23, 2019 20:19होमपेज › Solapur › तालमीच्या ‘वर्चस्वा’वरून निर्माण झालेल्या वैमनस्याला मिळावा पूर्णविराम 

तालमीच्या ‘वर्चस्वा’वरून निर्माण झालेल्या वैमनस्याला मिळावा पूर्णविराम 

Published On: Jul 12 2018 1:44AM | Last Updated: Jul 11 2018 10:35PMगुन्हेगारी विश्‍व : रामकृष्ण लांबतुरे 

माणूस मेला की वैर संपले पाहिजे.  पूर्ववैमनस्यातून, मागील भांडणातून, खुनाचा बदला खून असा विचार सुरू झाला तर निर्माण झालेले वैमनस्य संपणार नाही. यात वाढ होऊन येणारी तरुणाई भरकट जाते. पर्यायाने करिअर संपते. सूडभाव कमी करण्यासाठी कोणीतरी पुढाकार  घेऊन गँगवार संपवण्याची गरज आहे. पत्रा तालीम आणि पाणी वेस तालीम या तालमीच्या वर्चस्वातून निर्माण झालेल्या वैमनस्याला, गँगवारला पूर्णविराम मिळण्याची अत्यंत गरज आहे. यातूनच शहराचे नाव होत असते. 

पंधरा वर्षांपूर्वी शिवजयंतीच्या मिरवणुकीवेळी कोणत्या तालमीचा पहिल्यांदा सत्कार करावयाचा या क्षुल्लक कारणावरुन दोन गटांत भांडणे झाले. यावेळी पुढाकार घेऊन कोणीही  निर्माण झालेले वैमनस्य संपवण्याचा प्रयत्न केला नाही. परिणामी एका गटाने मिळून ऋतुराज शिंदे याचा अत्यंत निर्घृणपणे खून केला. हा राग ऋतुराजचे वडील सुरेश शिंदे उर्फ गामा पैलवान यांच्या मनात घर करुन राहिला होता. या प्रकारात सत्यवान उर्फ आबा कांबळे हा मुख्य आरोपी होता. तो मुंबई उच्च न्यायायालतून सुटला होता. गामा पैलवानने  वयात आलेल्या ऋतुराज शिंदेच्या जळत्या चितेला साक्ष ठेवून आबा कांबळेचा मुडदा पाडण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर बरेच वर्ष लोटल्यानंतर प्रकरणावर पडदा पडल्यासारखे वाटले; मात्र वैमनस्य, राग जिवंतच राहिला. हा राग शांत होणे गरजेचे होते. वडीलधारी म्हणून ते शांत राहून पुढच्या पिढीलाही समजावून सांगितले असते तर आबा खूनप्रकरण घडलेच नसते.

हाताला आलेला मुलगा अशाप्रकारे अवचितपणे गेल्यानंतर गामा पैलवान हताश झाले होते. रविराज, प्रशांत, गणेश या गामा पैलवानच्या पुतण्यांच्याही मनात सुडाची भावना तयार झालीच होती. त्यात आबाने सुटून आल्यानंतरही खुन्नस दाखविणे, धमकी देणे, नजरेला नजर भिडविणे असे प्रकार चालूच ठेवले होते. आमचा माणूस जाऊनही असे उद्योग चालू असल्याने तरुण रक्‍त आणखी खवळले. त्यानंतर तयार झाला ‘खून का बदला खून’चा आबाला संपवण्याचा कट. हा कट गामा पैलवानच्या घरातच त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने ठरला. 

यावेळीही गामा पैलवानने राग शांत करुन पुढील विचार, तरूण मुलांच्या भवितव्याचा विचार केला नाही. सुडाच्या भावनेने पेटल्याने कटाला हिरवा कंदील दिला. त्यानंतर शनिवारच्या रात्री साडेनऊच्या सुमारास मोबाईल गल्लीत आबा खूनप्रकरण घडले. आता तरी या तालमीच्या वर्चस्वाला पूर्णविराम मिळावा, एवढी  माफक अपेक्षा.