Wed, Apr 24, 2019 21:31होमपेज › Solapur › जिल्हा परिषदेत सत्तांतराचे संकेत!

जिल्हा परिषदेत सत्तांतराचे संकेत!

Published On: Jul 12 2018 1:44AM | Last Updated: Jul 11 2018 10:34PMसोलापूर : महेश पांढरे 

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्‍या सोलापूर जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच पडझड झाली असून अधिवेशनानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची डागडुजी करण्याचे संकेत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आले आहेत. कदाचित जिल्हा परिषदेत सत्तांतरदेखील घडू शकेल, असा सूचक इशारा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेवर पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेवर सध्या पूर्वीचे राष्ट्रवादीत असणारे मात्र सध्या सर्व पक्षांचा पाठिंबा घेऊन अध्यक्ष झालेले संजय शिंदे हे राष्ट्रवादीपासून चार हात लांब झाले आहेत तसेच अपक्ष निवडणूक लढवून त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले आहे. 

तर गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यामुळे राष्ट्रवादीपासून चार हात दुरावल्याने पवार परिवाराचा विश्‍वासही काहीअंशी कमी झाला आहे. जिल्हा परिषदेत सर्वाधिक संख्या राष्ट्रवादीची असतानाही सत्ता मात्र अपक्षांची का, असा सवाल काही जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित करुन जिल्ह्यातील सद्यपरिस्थितीचा पाढा वरिष्ठांसमोर वाचला आहे.

त्यामुळे वरिष्ठांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी जर जिल्ह्यातील पक्षबांधणीकडे वरिष्ठांनी लक्ष दिले नाही, तर विधानसभा आणि लोकसभेत अपेक्षित यश मिळणार नाही, असे ठासून जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातले आहे. 

त्यामुळे लवकरच पक्षाध्यक्ष शरद पवार आणि जिल्ह्याचे संपर्क नेते अजित पवार यांच्याशी चर्चा करुन यावर निर्णय घेऊ, असे आश्‍वासन जिल्ह्यातील नेतेमंडळींना देण्यात आले आहे. त्यामुळे अधिवेशनानंतर आणि पुढील विधानसभा, लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असणार्‍या जिल्हा परिषदेत मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षांची जवळपास दीड वर्षाची कारकीर्द पूर्ण झाली असली तरी त्यांच्या कार्यपध्दतीवर राष्ट्रवादीचे सदस्य नाराज असल्याचे दिसून आले आहेत. 
त्यामुळे ही नाराजी बर्‍याच दिवसांपासून धुसमत आहे. ती धुसफूस आता वरिष्ठांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे यावर आता निर्णयच होणे बाकी आहे.