Wed, Jul 24, 2019 12:34होमपेज › Solapur › ..अखेर सलूनच्या खुर्चीसाठी 50 लाखांची तरतूद

..अखेर सलूनच्या खुर्चीसाठी 50 लाखांची तरतूद

Published On: Sep 08 2018 1:34AM | Last Updated: Sep 07 2018 10:12PMसोलापूर : प्रतिनिधी

होतकरू न्हावी समाजातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने सलूनच्या खुर्चीसाठी अखेर 50 लाख रुपयांच्या निधीची तरतूद स्थायी समितीत करण्यात आल्याची माहिती अर्थ व बांधकाम समितीचे सभापती तथा स्थायी समितीचे अध्यक्ष विजयराज डोंगरे यांनी दिली. याबाबत दै.पुढारीने ‘सलूनच्या खुर्चीला लागला वस्तरा’ या मथळ्याखाली  वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत या योजनेच्या पूर्णत्वासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. 

जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात गुरुवारी दुपारी विजयराज डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष शिवानंद पाटील, सभापती रजनी देशमुख, सदस्य शीला शिवशरण, आनंद तानवडे, उमेश पाटील, ज्योती पाटील, अतुल पवार, अमर पाटील आदी सदस्य उपस्थित होते. 

जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांच्या पुढाकाराने सलूनच्या खुर्चीसाठी अनुदान देण्याची योजना अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आली होती. मात्र पाच महिन्यात केवळ दहा लाख रुपयांची तरतूद करुन या योजनेला कागदावरच ठेवण्यात आले होते. याबाबत दै. पुढारीने सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर जि.प. पदाधिकार्‍यांनी या योजनेला तातडीने निधीची तरतूद करुन हिरवा कंदील दिला.  महिला व बालकल्याण विभागाकडील 99 लाख निधीतून अंगणवाडी साहित्य पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी 39 लाख रुपयांच्या निधीतून सतरंजी खरेदी करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. 50 लाखांच्या निधीतून टॅलीचे प्रशिक्षण महिला व युवतींना देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. पशुसंवर्धन विभागाकडील निधीतून पशुखाद्य खरेदी करण्यासाठी 50 लाख, औषधांची खरेदी करण्यासाठी 1 कोटींच्या निधी खर्चास यावेळी मान्यता देण्यात आली. 

जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त असलेल्या दोन कोटींच्या निधीतून शाळा दुरुस्तीसाठी निधी खर्च करण्यास यावेळी मंजुरी देण्यात आली. ज्या शेतकर्‍यांनी कोटेशन भरले आहे, मात्र अद्याप त्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन मिळाले नाही, त्यांना डिसेंबरपर्यंत वीज कनेक्शन देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून 19 प्रकरण मंजूर करुन तरुणांना 65 लाख रुपयांचे कर्ज मंजुरीचा प्रस्ताव संबंधित बँकेकडे देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण योजनेतून 10 कोटी 75 लाखांच्या निधीतून शेतकर्‍यांना विविध यांत्रिक योजनेचा लाभ देण्यात येत असल्याची माहिती यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडून देण्यात आली. रोजगार हमी योजनेतून विहीर घेण्यासाठी भूजल विभागाने प्राप्त प्रस्तावानुसार मंजुरी देण्याची कार्यवाही करावी, अशीही सूचना यावेळी करण्यात आली. ग्रामपंचायत, पंचायत समितीत अद्याप बायोमेट्रीक मशीन का बसविण्यात आले नाही, अशी विचारणा यावेळी सदस्य उमेश पाटील यांनी केली. यावेळी सुमारे 400 ग्रामपंचायतीत बायोमेट्रीक बसविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. स्थायी समितीच्या बैठकीस जे खातेप्रमुख उपस्थित नाहीत, त्यांच्या प्रतिनिधींना यापुढे बैठकीस बसू न देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश जोशी यांचे प्रतिनिधी म्हणून आलेले उपशिक्षणाधिकारी अशोक भांजे यांना त्यामुळे सभेच्या बाहेर काढण्यात आले. 

सावळेश्‍वरमधील 61 लाभार्थ्यांना लाभ
जिल्हा परिषद सेस फंडातून घेण्यात येणार्‍या विविध योजनेच्या लाभासाठी मोहोळ तालुक्यातील सावळेश्‍वर येथील 61 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र या लाभार्थ्यांना ग्रामसभेकडून मंजुरी मिळत नव्हती. यासाठी तीनदा ग्रामसभा आयोजित केल्यानंतरही या विषयाला राजकीय पध्दतीने टाळण्यात आल्याने या लाभार्थ्यांना स्थायी समिती अधिनियम कलम 8 नुसार योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष विजयराज डोेंगरे यांनी दिली.