Mon, Mar 25, 2019 17:56होमपेज › Solapur › ‘महिला बालकल्याण’ साठी तीन नगरसेविकांमध्ये रस्सीखेच

‘महिला बालकल्याण’ साठी तीन नगरसेविकांमध्ये रस्सीखेच

Published On: May 15 2018 10:52PM | Last Updated: May 15 2018 10:28PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिका महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी सहकारमंत्री गटाच्या अनिता कोंडी, संगीता जाधव तसेच पालकमंत्री गटाच्या रामेश्‍वरी बिर्रु यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

महापालिकेच्या स्थापत्य, शहर सुधारणा, वैद्यकीय सहाय व आरोग्य, मंड्या व उद्यान, विधी, कामगार व समाजकल्याण, महिला व बालकल्याण या सात विशेष समित्या आहेत. यातील महिला व बालकल्याण ही समिती महत्त्वाची समजली जाते. स्थायी समितीनंतर या समितीमध्ये सदस्य, सभापती होण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असते. मनपावर भाजपची सत्ता मार्च 2017 मध्ये आल्यावर पहिल्या वर्षी महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी सहकारमंत्री गटाच्या नगरसेविका अश्‍विनी चव्हाण यांना संधी देण्यात आली होती. समितीच्या एका वर्षाचा कार्यकाल संपल्यावर गत महिन्यात झालेल्या मनपा सर्वसाधारण सभेत सातही समित्यांच्या नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर नुकतेच सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. याकरिता बुधवारी नामनिर्देशन पत्र भरण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी सहकारमंत्री गटाच्या अनिता कोंडी, संगीता जाधव व पालकमंत्री गटाच्या रामेश्‍वरी बिर्रु असे तीन जण इच्छुक आहेत. यापैकी कोंडी या तिसर्‍यांदा मनपावर निवडून आल्या आहेत. जाधव व बिर्रु हे प्रथमच निवडून आले आहेत. अनुभवी नगरसेविका तसेच पक्षासाठी आतापर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणून आपल्याला सभापतीपद मिळावे, अशी सहकारमंत्री गटाच्या कोंडी यांची मागणी आहे. याच गटाच्या जाधव यांनीदेखील आपल्याला संधी मिळावी, अशी मागणी रेटली आहे.

पालकमंत्री गटाकडून बिर्रु या एकमेव इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. गतवर्षी हे पद सहकारमंत्री गटाकडे गेल्याने यंदा हे पद पालकमंत्री गटाला मिळावे, अशी पालकमंत्री गटाची मागणी आहे. या दोन्ही गटांच्या मागणीबाबतची माहिती शहराध्यक्ष अशोक निंबर्गी हे प्रदेशला कळविणार असल्याची माहिती आहे. प्रदेशकडून उमेदवारी कोणाला द्यायचे, हे निश्‍चित होणार असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, गत वर्षी विशेष समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपअंतर्गत गटबाजीमुळे भाजपची नामुष्की झाली होती. भाजपच्या एका गटाने विरोधकांना रसद पुरविल्याने विरोधी पक्षाचे उमेदवार काही समित्यांवर निवडून आले होते. अशी नामुष्की यंदाच्या निवडणुकीत येऊ नये, म्हणून विरोधी पक्षांसमवेत आधीच समझोता होण्याची चिन्हे आहेत. 

सोमवारी दुपारपर्यंत तरी या निवडणुकीसंदर्भात धोरण ठरले नव्हते. सात समित्यांची निवडणूक अविरोध करण्यासाठी सत्ताधार्‍यांचा प्रयत्न राहणार आहे, मात्र वाटाघाटी फिसकटल्यास निवडणूक अविरोध होण्याची शक्यता नाही. हे लक्षात घेता राजकीय व्यूहरचना आखण्याचे काम सत्ताधारी व विरोधकांना करावे लागणार आहे.