Fri, Nov 16, 2018 15:40होमपेज › Solapur › महिला व बालकल्याण समितीची संगारेड्डी भेट

महिला व बालकल्याण समितीची संगारेड्डी भेट

Published On: Mar 11 2018 11:24PM | Last Updated: Mar 11 2018 11:16PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी नुकतेच आंध्र प्रदेशातील संगारेड्डी जिल्हा परिषदेला भेद देऊन नावीन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली. सभापती रजनी देशमुख यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. 

यावेळी संगारेड्डी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी समितीच्या सदस्यांनी सविस्तर चर्चा करुन योजनांची व अंमलबजावणीची माहिती घेतली. विशेषता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून राबविण्यात येणार्‍या योजना अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी दिसून आले. 

दारिद्य्ररेषेखालील बेघर कुटुुंबास या जिल्हा परिषदेकडून टू बीएचके फ्लॅट देण्याची योजना आहे. याशिवाय 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणार्‍या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हजार रुपयांची पेन्शन योजना याठिकाणी आहे. 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने महिलांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. यात उदबत्ती तयार करणे, फिनेल तयार करणे, साबण तयार करणे, वॉशिंग पावडर तयार करणे आदी प्रकारचे उद्योग प्रशिक्षण देण्यात येते. याशिवाय मातीशिवाय फळे व भाजीपाल कशा पध्दतीने वाढविता येतात याचेही प्रशिक्षण महिलांना देण्यात येत असल्याने येथील महिला स्वयंपूर्ण होत असल्याचे दिसून आले. 

आंध्र प्रदेशमधील जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणार्‍या काही चांगल्या योजनांचे अनुकरण करुन त्या योजना राबविणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत यावेळी सभापती देशमुख यांनी व्यक्‍त केले. महिलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी आवश्यक असणार्‍या योजना महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने सुरु करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्‍त केला. यावेळी समितीचे सदस्य उपस्थित होते.