Wed, Apr 24, 2019 16:39होमपेज › Solapur › सरकारला खाली खेचल्याशिवाय थांबणार नाही

सरकारला खाली खेचल्याशिवाय थांबणार नाही

Published On: Sep 04 2018 11:38PM | Last Updated: Sep 04 2018 11:38PMसोलापूर ; प्रतिनिधी 

गेल्या चार वर्षांपासून सर्वसामान्य लोकांना भूलथापा देऊन वेड्यात काढणार्‍या भाजप-शिवसेना सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय ही जनसंघर्ष यात्रा आता थांबणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सोलापुरात सरकारला दिला. काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रभर सुरू असलेल्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालय येथे आयोजित जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसच्या इतर नेत्यांनीदेखील राज्य व केंद्रातील भाजप सरकारांवर जोरदार टीका केली. 
तसेच पालकमंत्री व सहकारमंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादावरदेखील यावेळी काँग्रेस नेत्यांनी खोचक टीका केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ नेतेमंडळी या ठिकाणी उपस्थित होते. 

भाजप सरकार हे केवळ आश्‍वासनांचा कारखाना असून, अद्याप शासनाने सर्वसामान्य लोकांना दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे लोकामंध्ये शासनाविरोधात प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन खा. अशोक चव्हाण यांनी केले. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही भाजपवर सडकून टीका करताना केवळ आश्‍वासनांची खैरात देणारे हे सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. नोटाबंदी फसली आहे. कर्जमाफी खोटी, इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत, शेतीमाल तर कवडीमोल झाले आहेत. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताच अधिकार नाही. त्यामुळे आगामी निवडणूक भाजप-सेनेची सत्ता नेस्तनाबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता सज्ज राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजप सरकारवर निशाणा साधला. केवळ आश्‍वासने देण्यात पटाईत असणारे हे सरकार हिंदू-मुस्लिम आणि इतर जातींमध्ये विष पेरून पुन्हा सत्तेवर येऊ पाहात आहे. कट्टर हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणार्‍या या सरकारच्या काळात सनातन धर्माचा प्रचार करणार्‍यांकडे अनेक विघातक साधनसामुग्री सापडली तरी सरकार यावर काहीच बोलायला तयार नाही. त्यामुळे या शासनाला आता सत्तेतून घालविल्याशिवाय कार्यकर्त्यांनी स्वस्थ बसू नये, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी आ. पी. डी. सावंत, आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. अमर राजूरकर, आ. बाळासाहेब थोरात, आ. शरद रणपिसे, आ. प्रणिती शिंदे, आ. रामहरी रुपनवर, हेमा चिंचोळकर, इंदूमती अलगोंडा, प्रकाश वाले, प्रकाश पाटील, कांचन भोसले, सुरेखा फुलारी, गुरुसिध्द म्हेत्रे, लक्ष्मण भोसले, बाळासाहेब शेळके, नगरसेवक चेतन नरोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी, तर आभार जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी मानले.