Tue, Apr 23, 2019 19:56होमपेज › Solapur ›  पारंपरिक यंत्रमाग होणार कमी

 पारंपरिक यंत्रमाग होणार कमी

Published On: Apr 29 2018 10:09PM | Last Updated: Apr 29 2018 9:32PM  सोलापूर ः वेणुगोपाळ गाडी

गेली अनेक वर्षे पारंपरिकपणे चालणार्‍या यंत्रमाग उद्योगात आता बदल अटळ आहे. पारंपरिक जुने यंत्रमाग टप्प्याटप्प्याने कमी होऊन त्याची जागा आधुनिक यंत्रमाग घेणार असल्याने येत्या काही वर्षांत या उद्योगाचा कायापालट होणार आहे.

सोलापूर हे एकेकाळी हातमाग उद्योगासाठी सुपरिचित होते. धोती, टॉवेलसह विविध उत्पादने घेतली जात. काळाच्या ओघात हातमागाची जागा यंत्रमागाने घेतली. यंत्रमागावर चादरींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. चादरीला बाजारपेठ सीमित असल्याने यंत्रमागधारकांनी ग्लोबल  मार्केट असलेल्या टॉवेल उत्पादनावर लक्ष केंद्रित केले. 

जागतिकीकरण झाल्यापासून सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगावर परिणाम होण्यास सुरूवात झाली. पारंपरिक पद्धतीने निर्माण होणार्‍या सोलापुरी टॉवेलला अनेक स्पर्धक निर्माण झाले. सोलापुरात टॉवेल निर्मितीचे उत्पादन मूल्य दिवसेंदिवस वाढतच चालले खरे, पण त्या तुुलनेत भाववाढ मिळत नाही, अशी ओरड आहे. त्यामुळे आता उत्पादन मूल्य कमी करण्याचे उपाय योजण्याची वेळ यंत्रमाग उद्योगावर आली आहे. कच्च्या मालाचे वाढते भाव तसेच कामगार तुटवड्याला सामोरे जावे लागणार्‍या यंत्रमागधारकांना आता पारंपरिक यंत्रमागाऐवजी शटललेस रॅपिअर लूमचा आधार घ्यावा लागणार आहे. अनेक कारखानदारांनी रॅपिअर लूम आणून बदल स्वीकारला आहे. अत्याधुनिक लूमवर कमी कामगारांच्या मदतीने अनेक पटींचे जादा उत्पादन घेणे व्यवहार्य ठरत आहे. यामुळे उत्पादन मूल्य कमी होण्यास मदत होत असल्याने अलीकडे रॅपिअर लूम आणण्याचे प्रमाण वाढीस लागत आहे. 

येत्या चार-पाच वर्षांत पारंपरिक यंत्रमाग कमी होऊन त्याची जागा अत्याधुनिक यंत्रमागांनी घेतल्याचे चित्र दिसणार आहे. मार्केटिंगचा अभाव असलेल्या सोलापूरच्या यंत्रमाग उद्योेगाला नवनवीन संधी खुणावत आहेत. अत्याधुनिक लूममुळे एक्स्पोर्टचे मोठे ऑर्डर घेणे शक्य आहे. योगगुरु रामदेवबाबा यांनी गत महिन्यात पतंजलीसाठी सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगाची मदत घेण्याचे जाहीर केले आहे. असे झाल्यास पतंजलीचे मोठे काम सोलापूरच्या यंत्रमागधारकांना मिळणार आहे. अशा आणखीन संधी मिळण्यासाठी यंत्रमागधारकांना खटाटोप करावा लागणार आहे.एकंदर सोलापूरचा यंत्रमाग उद्योग पारंपरिकता सोडून आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे.