Wed, Mar 20, 2019 09:04होमपेज › Solapur › सुसाट वाहनांना ब्रेक कधी?

सुसाट वाहनांना ब्रेक कधी?

Published On: Feb 09 2018 2:03AM | Last Updated: Feb 08 2018 9:54PMसोलापूर : इरफान शेख

 सोलापूर शहरामधून जाणार्‍या सोलापूर-विजापूर महामार्गाने अनेक सोलापूरकरांना गिळले आहे. हा मार्ग मृत्यू महामार्ग म्हणून ओळखला जातो.गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गावर अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत.लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत व पायी जाणार्‍या पादचार्‍यांपासून ते दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरुन येथून ये-जा करावी लागत आहे. कंबर तलावापासून ते सोरेगाव व सैफुलपर्यंतचा भाग हा अतिक्रमणाने व्यापला असून मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातात मरण पावलेल्यांची संख्या वाढतच चालली आहे.

राष्ट्रीय महामार्ग 13 (सध्या नॅशनल हायवे 52) महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांदरम्यान आहे. हा महामार्ग शहराच्या हृदयातून जातो. दुपारच्या वेळी सोलापूर शहराच्या मध्य भागात जड वाहनांची भयानक अशी   गर्दी असते. विजापूर नाका, पत्रकार भवन चौक, आयटीआय, नेहरुनगर, सैफुल, सोरेगाव  या चौकांमधून  जीवघेणी वाहतूक होताना दिसते. या महामार्गावर कोणत्याही प्रकारची सिग्नल व्यवस्था करण्यात आली नाही. परंतु जड वाहतुकीच्या या महार्गावरील चौकांत पानटपरी, फळ विके्रते, भजी विक्रेते, ऑम्लेट गाड्या, बेशिस्त रिक्षाचालक यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असते.

प्रशासन अतिक्रमणाच्या  मुख्य समस्येकडे लक्ष देत रस्ता मोकळा करण्याऐवजी दुसर्‍याच कामात व्यस्त आहे. सोलापूर-विजापूर महामार्गावर दाट लोकवस्ती आहे.दुचाकीधारकांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. महामार्गाला चिकटून शॉपिंग सेंटर व लोकवस्ती असल्याने पायी जाणार्‍यांची संख्या मोठी दिसून येते. या महामार्गावरुन परराज्यांतील कंटेनर, ट्रक अशी अनेक प्रकारची जड वाहने भरधाव वेगात जातात. रस्त्याच्या मधोमध असणार्‍या डिव्हायडरला रस्ता दुभाजकेदेखील अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडणार्‍यांची संख्यादेखील मोठी आहे. जड वाहने भरधाव वेगात जाताना  अचानक कोणी व्यक्ती समोर आली तर या जड वाहनांना ब्रेकदेखील लागणे अवघड आहे.

शहरातील वाहनधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अतिक्रमणाचा विळखा वाढतच चालला आहे. फळ विक्रेते, बेशिस्त रिक्षाचालक, पानटपर्‍या, भजींच्या गाड्या यामुळे फुटपाथ झाकले गेले आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्‍नदेखील मोठा होत चालला आहे. सैफुल चौकात तर रस्त्याला चिकटून भाजी मार्केट थाटल्याने रस्ता अरुंद झाला आहे. 

स्थानिक मनपा प्रशासनाने, पोलिस प्रशासनाने शहरामधून जाणार्‍या महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याचे मुख्य कार्य करावे, अशी मागणीदेखील अनेक वाहनधारकांनी व नागरिकांनी वेळोवेळी केली आहे. 

प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ या मार्गावरील वाहतुकीचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सिग्नलपेक्षा कर्नाटकच्या गाड्यांवर लक्ष
विजापूर रोडवर फक्त पत्रकार भवन चौकातच सिग्नल यंत्रणा आहे. याठिकाणाहून होणार्‍या जड वाहतुकीवर तसेच छोट्या-मोठ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरुपी वाहतूक कर्मचार्‍याची नेमणूक करण्यात आलेली आहे. या कर्मचार्‍यामुळे वाहतुकीला शिस्त लागेल, अशी अपेक्षा असते. परंतु हा कर्मचारी नेहमी सिग्नल यंत्रणेपेक्षा कर्नाटक राज्यातून येणार्‍या भाविकांच्या गाड्यांवरच जास्त लक्ष ठेवून असल्याचे दिसून येते. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांची नेमणूक एन्ट्री वसुलीसाठी आहे की वाहतूक नियंत्रित करण्यासाठी हा प्रश्‍न उपस्थित होतो. 

जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण नाही
सोलापूर-विजापूर महामार्गावरुन  जाणार्‍या  जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण नाही. शहरातून जाणार्‍या  जड वाहनांवर 20 कि.मी. प्रति तास अशी मर्यादा असतानादेखील त्यांचा वेग अधिक असतो. या महामार्गावर अतिक्रमणाचा विळखा असल्याने पायी जाणार्‍यांना जीव मुठीत धरुन जावे लागत आहे. भरधाव वेगात जाणार्‍या जड वाहनांवर  वाहतूक पोलिस कधीच कारवाई करत नाहीत. मनपा प्रशासनानेसुध्दा अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले आहे.

महामार्गावर सिग्नलच नाही
सोलापूर-विजापूर महामार्गावर सिग्नलच नाही. त्यामुळे येथून जाणार्‍या वाहनांवर नियंत्रणदेखील नाही. पत्रकार भवन चौक सोडला तर सोलापूर शहर संपेपर्यंत एकही सिग्नल नाही. जागोजागी रस्ता दुभाजक असल्याने रस्ता ओलांडणार्‍यांची संख्यादेखील मोठी आहे. वेगावर नियंत्रण नसणारी जड वाहने रस्ता ओलांडणार्‍यांना चिरडून  पुढे जातात. कंबर तलाव ते सोरेगावपर्यंत पोलिस फक्त एन्ट्री वसुली करताना दिसतात.

रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे
विजापूर रोडवर सातत्याने किरकोळ तसेच मोठे अपघात होत असतात. शहरातून जाणार्‍या जड वाहनांमुळे हे अपघात होत असल्याचेही उघड झाले आहे. या अपघातांना जड वाहतूक जशी जबाबदार आहे तशीच रस्त्याच्या दुतर्फा फुटपथावर असलेले अतिक्रमणही जबाबदार असल्याचे बोलले जाते. वर्दळीच्या विशेषत: सायंकाळी दोन्ही बाजूला फूटपाथवर भाजी व फळ विक्रेते आणि इतरांनी केलेली मोठी अतिक्रमणे दिसून येतात. त्यामुळे ही अतिक्रमणे कायमस्वरुपी हटविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी मनपाची वाहने येतात. परंतु चिरीमिरी घेऊन तात्पुरत्या स्वरुपात ही अतिक्रमणे हटविण्यात येतात. परत दोन दिवसांनी आहे तशीच अतिक्रमणे दिसून येतात.