Sun, Jun 16, 2019 02:47होमपेज › Solapur › वाहनाचा ठेका एकाला, बिले दुसर्‍याच्या नावे अदा

वाहनाचा ठेका एकाला, बिले दुसर्‍याच्या नावे अदा

Published On: Apr 06 2018 10:07PM | Last Updated: Apr 06 2018 9:32PMसोलापूर :

जिल्हा क्षयरोग कार्यालयात शासकीय वाहन असताना दुसरे भाडेतत्त्वावर वाहन लावून शासनाला भुर्दंड बसला आहे. त्याहून कहर करत या कार्यालयाने वाहनाचा ठेका ऐकाला आणि त्याची बिले दुसर्‍याच्या नावे अदा करण्याचा  गलथान कारभार केला आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या गैरप्रकारातील सर्वांचे निलंबन, चौकशी आणि बिलाची रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल करणे गरजेचे आहे.

एकीकडे आरोग्य विभागात 15-15 वर्षांपासूनच्या अ‍ॅम्ब्युलन्स कार्यरत आहेत. दुसरीकडे जिल्हा क्षयरोग कार्यालयात दहा वर्षांपूर्वीचे शासकीय वाहन सुस्थितीत नसल्याचे भासवत दुसरे भाडेतत्त्वावर वाहन घेतले. तेही गैरप्रकारे. यामध्येही गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही वाहन पुरवणारी कंपनी श्रीकांत नडगम यांच्या नावे आहे. त्यांनीच भाडेतत्त्वावर वाहन पुरवले आहे. हे पुरवलेले वाहन हे लाडप्पा जयप्पा नडगम यांच्या नावावर आहे. त्यामुळे शासनाची सर्वचबाबतीत दिशाभूल केल्याचे स्पष्ट होत आहे. हे वाहन वापरल्यानंतर वाहन पुरवणारी कंपनी गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या नावे बिले अदा करणे गरजेचे आहे. मात्र ही वाहन पुरवणारी फर्म सोडून इतरांच्या नावे बिले अदा केली आहेत. ज्यामध्ये जिल्हा क्षयरोग कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. के. शेगर, डिस्ट्रक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर (टीबी) व्ही. एस. शेगर आणि इतर श्रीकांत नडगम,  तैसीफ मुजावर यांचा समावेश आहे. तरी या सर्वांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा, बिलाची रक्कम या सर्वांच्या वेतनातून वसूल करणे, वाहन पुरवठा करणार्‍या कंपनीला काळ्या यादीत टाकणे, अधिकारी-कर्मचार्‍यांना निलंबित करणे अशी कारवाईची मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.