Sat, Apr 20, 2019 10:40होमपेज › Solapur › उडीद उत्पादकांची पट्टी मिळेना

उडीद उत्पादकांची पट्टी मिळेना

Published On: Dec 25 2017 1:17AM | Last Updated: Dec 24 2017 9:08PM

बुकमार्क करा

सोलापूर : संतोष आचलारे

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू करण्यात आलेल्या हभीभाव खरेदी केंद्रात गत महिन्याभरात 213 शेतकर्‍यांनी 1408 क्विंटल उडीद घातली आहे. यासाठी शेतकर्‍यांना 63 लाख 63 हजार रुपयांची पट्टी मिळणे अपेक्षित असतानाही पट्टी मिळत नसल्याने शेतकर्‍यांतून संताप व्यक्त होत आहे. वास्तविक पाहता एका आठवड्याच्या आत शेतकर्‍यांना पट्टी देणे नियमाने बंधनकारक आहे, असे असतानाही शेतकर्‍यांना पट्टी मिळत नाही. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गूळ बाजारात गत महिन्यात 21 नोव्हेंबर रोजी सोयाबीन, उडीद व मूग खरेदी केंद्र पाच तालुक्यांसाठी सुरु करण्यात आले होते. 10 डिसेेंबरपर्यंत यासाठी ऑनलाईनने नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांचा शेतमाल हमीभावाने खरेदी करण्यात आला. आतापर्यंत या केंद्रात 1408 क्विंटल उडीद, तर 1.5 क्विंटल सोयाबीनची खरेदी शेतकर्‍यांकडून करण्यात आली आहे. 

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून हमीभावाने शेतकर्‍यांचा माल खरेदी करण्यात येतो. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी एजन्सी म्हणून शेतकरी व मार्केटिंग फेडरेशनमध्ये महत्त्वाचा दुवा म्हणून काम केले आहे. बाजार समितीने स्वत:हून खरेदी केंद्रात शेतकर्‍यांना अनेक सुविधा दिल्याने यंदा शेतकर्‍यांना उशिरा का होईना पण हमीभावाने माल विकता आला आहे. 

हमीभावाने शेतकर्‍यांचा शेतमाल खरेदी करताना अनेक अडचणींना शेतकर्‍यांना सामोरे जावे लागले होते. शेतकर्‍यांनी आधार लिंक असलेल्या बँक खात्यात शेतकर्‍यांची पट्टी आठ दिवसांच्या आत जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. मात्र मार्केटिंग फेडरेशनचे काम अत्यंत थंड दिसून येत असून महिन्याभराच्या कालावधीनंतरही शेतकर्‍यांना पट्टी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 
एकतर यंदाच्या वर्षी उशिराने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. तरीही शेतकर्‍यांनी माल उत्पादन झाल्यानंतर तीन महिने माल घरी ठेवून खरेदी केंद्रात माल आणला. माल आणल्यानंतर 15 दिवसांत पट्टी मिळण्याची अपेक्षा असताना महिन्याभरानंतरही पट्टी मिळत नसल्याने शेतकर्‍यांचा सहनशीलतेचा अंत सुटत आहे. 

शेतमालाच्या पट्टीच्या भरोशावर शेतकर्‍यांनी उधारी व कर्जे काढली आहेत. सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख हे सोलापूरचेच आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीने त्यांची देय असलेली पट्टी देण्याचे आदेश त्यांनी द्यावेत, अशी मागणी होत आहे.