Wed, Apr 24, 2019 19:53होमपेज › Solapur › ट्रॅकमॅन आत्महत्या, गँगमनच्या बदल्या हे विषय गाजणार

ट्रॅकमॅन आत्महत्या, गँगमनच्या बदल्या हे विषय गाजणार

Published On: Sep 06 2018 1:43AM | Last Updated: Sep 05 2018 10:31PMसोलापूर : प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या पुणे व सोलापूर डिव्हिजन अंतर्गत येणार्‍या सर्व खासदारांची बैठक पुण्यात होणार आहे. दरवर्षी ही बैठक होत असली तरी यंदाच्या बैठकीत महत्त्वाचे विषय अजेंड्यावर आहेत. सोलापूर, पुणे, अहमदनगर, गुलबर्गा, शिर्डी, बारामती, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांतील एकूण 11 खासदार या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. त्यात प्रामुख्याने ट्रॅकमॅनची आत्महत्या व गँगमनच्या बदल्यांचा विषय गाजणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठस्तरीय सूत्रांने दिली आहे. 

मध्य रेल्वे विभागात एकूण 5 डिव्हीजन आहेत. त्यामध्ये पुणे व सोलापूर हे दोन डिव्हीजन महत्त्वपूर्ण आहेत. दरवर्षी खासदारांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही डिव्हीजनची बैठक होत असते. यंदाही ही आढावा बैठक शुक्रवारी (7 सप्टें.) आयोजित करण्यात आली आहे. सोलापूर डिव्हीजनमध्ये 15 ऑगस्ट रोजी अहमदनगर स्टेशनजवळ असलेल्या वांभोरी स्टेशनजवळ बबलू कुमार या ट्रॅकमॅनने सुट्टी न मिळाल्यामुळे आत्महत्या केली होती. हा विषय या बैठकीत गाजण्याची शक्यता आहे. तसेच गँगमन पदावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या बदल्या का होत नाहीत, हादेखील मुद्दा समोर येण्याची शक्यता आहे. आरयूबी (रोड अंडर ब्रिज) असलेल्या ठिकाणी सांडपाणी किंवा ड्रेनेजचे पाणी थांबून अनेक समस्या खासदारांसमोर आल्या आहेत. हादेखील विषय या बैठकीत येणार असल्याची चर्चा वर्तवण्यात येत आहे.

सोलापूर डिव्हीजनमधील व पुणे डिव्हीजनमधील रेल्वेस्थानकांवरील अनेक दुकानांचे गेल्या अनेक वर्षांपासून टेंडर निघाले नाहीत. त्याविषयीदेखील यापूर्वीच अनेक खासदारांनी मागणी केली आहे. या बैठकीस खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे, विजयसिंह मोहिते-पाटील, मल्लिकार्जुन खरगे (गुलबर्गा), हेमंत गोडसे (नाशिक), सुप्रिया सुळे (बारामती), दिलीप गांधी (अहमदनगर), प्रितम मुंडे (बीड), रविंद्र गायकवाड (उस्मानाबाद), सुनील गायकवाड (लातूर), संजय पाटील (सांगली) यासोबत रेल्वेचे महाव्यवस्थापक शर्मा, सोलापूरचे डीआरएम हितेंद्र मलहोत्रा, पुणे डीआरएम बी.के. दादाभाऊ व तसेच मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत.