होमपेज › Solapur › यंदा ईको-फे्रंडली गणेश मूर्तींची वाढतेय क्रेझ

यंदा ईको-फे्रंडली गणेश मूर्तींची वाढतेय क्रेझ

Published On: Sep 06 2018 1:43AM | Last Updated: Sep 05 2018 10:21PMसोलापूर : प्रतिनिधी 

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे जलप्रदुषणात वाढ होत असल्याने आणि तळ्यांमध्ये विसर्जित झालेल्या गणेश मूर्ती वर्षानुवर्षे विरघळत नसल्यामुळे उन्हाळ्यात पाणी अटल्यावर त्या उघड्या पडून मूर्तींची होणारी विटंबना यामुळे सध्या ईको-फ्रेंडली अर्थात मातीच्या मूर्तीची क्रेझ वाढली आहे.

सोलापुरातील अंबादास भंडारी यांनी पर्यावरणाचा होणार र्‍हास मे महिन्यामध्ये सिध्देश्‍वर मंदिर तळ्यातील विसर्जन कुंडामध्ये गणेश मूर्तींची झालेली विटंबना पाहून यंदा जास्तीत जास्त मातीच्या मूर्ती लोकांनी घ्याव्यात यासाठी जागृती अभियान सुरु केले होते.

मात्र पीओपीच्या तुलनेत मातीची मूर्ती अधिक सुबक आणि आकर्षक होत नसल्याने अनेकांकडून इच्छा असूनही मातीची मूर्ती घेतली जात नव्हती. त्यामुळे पीओपीप्रमाणे साच्यामध्ये घालून हवा तसा आकार करता येईल अशा मातीचा शोध अंबादास यांनी घेतला व आंध्र व तेलंगणा येथील विशिष्ट मातीच्या मूर्ती एकत्र आणून त्यांनी पीओपीसारख्या सुबक मूर्ती तयार केल्या.

विशेष म्हणजे या मूर्तीची माती कुंडीत टाकली तर त्यातील रोपांना त्या मातीचे कोणतेच दुष्परिणाम जाणवत नाहीत. त्यामुळे या मूर्तींना बाजारात अधिक मागणी वाढत आहे.या मातीच्या मूर्ती बादलीत विसर्जित करुन त्या किती वेळात विरघळतात याचा प्रयोगही त्यांनी केला असून या मूर्तीतील माती दहाव्या मिनिटाला विरघळण्यास सुरुवात झाली व 15 ते 20 मिनिटांत मूर्ती संपूर्ण विरघळून बादलीत पाण्याच्या तळाशी मातीचा चिखल तयार झाला.

पीओपीपेक्षा  मातीच्या मूर्ती पन्नास रुपयांनी महाग

गणेश मूर्तींच्या किंमतीमध्ये यंदाही दरवर्षीप्रमाणे वाढ झाली असून पीओपीच्या अक्रॅलिक रंग दिलेल्या अतिशय आकर्षक एक फुटाच्या मूर्ती साधारण पाचशे रुपायंपासून विक्रीला उपलब्ध झाल्या आहेत. दीड फूट उंचीच्या साडेसातशे व पावणेदोनफूट उंचीच्या मूर्तीची किमंत हजार रुपयांपासून सुरु होते. इतक्याच आकाराच्या मातीच्या मूर्ती पीओपीपेक्षा पन्नास ते शंभर रुपयांनी अधिक असल्याची माहिती मूर्तीकारांनी दिली. माती बाहेरील राज्यातून मागावावी लागत असल्याने त्याचा निर्मिती खर्च वाढल्याने हा फरक होत असल्याचेही त्यांनी सांगितले.