Fri, Apr 26, 2019 04:08होमपेज › Solapur › एलएफसीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी उन्हात उभे राहण्याची शिक्षा

एलएफसीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी उन्हात उभे राहण्याची शिक्षा

Published On: Jun 15 2018 10:35PM | Last Updated: Jun 15 2018 10:11PMसोलापूर : प्रतिनिधी 

शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत सुरु असताना लिटील फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मात्र काही मिनिटे उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह गेटच्या बाहेर उन्हात उभे रहायची शिक्षा शाळेने केली. त्यामुळे अतिशय उत्साहाने शाळेला आलेल्या मुलांसह पालकांचाही मूड ऑफ झाला.

गांधीनगर येथील लिटील फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूलच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शुक्रवारी पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालकांना बसला. पालकांना शाळेच्या सूचना मोबाईलवर एसएमएसव्दारे देण्याची यंत्रणा आहे. त्यानुसार 18 तारखेला स्कूल रिओपन होणार असल्याचा मेसेज आला होता. त्यामुळे पालक निर्धास्त होते. मात्र अचानक 14 तारखेला दुपारी एसएमएस आला आणि गव्हर्नमेंट जीआरनुसार 15 तारखेला स्कूल रिओपन होणार असल्याने 7.40 ला विद्यार्थ्यांना शाळेत आणावे, असे सांगितले. त्यामुळे उरलेल्या अर्ध्या दिवसातच गणवेशापासून ते बॅगपर्यंत जमवाजमव करताना पालकांची त्रेधा उडाली. इतके सारे केल्यानंतरही कसेबसे आवरून पालक त्यांच्या चिमुकल्यांना घेऊन शाळेत पोहोचले आणि शार्प 7.40 ला शाळेचे गेट वॉचमनने बंद करून टाकले आणि कुणालाच प्रवेश दिला नाही.

पहिल्या दिवसाच्या गडबडीमुळे निम्म्याहून अधिक मुलांना शाळेत पोहोचायला पाच-दहा मिनिटे उशिर लागला. त्या सार्‍यांना शाळेची प्रार्थना आणि पहिल्या दिवसाच्या सूचना स्वागत भाषणे होईपर्यंत गेटच्या बाहेर रस्त्यावर उन्हात उभे रहायची जणू शिक्षाच शाळेने दिली. प्रार्थना आणि छोटेखानी कार्यक्रम संपल्यावरही पहिल्यांदाच शाळेत येणार्‍या मुलांच्या पालकांनाही गेटच्या आत जाऊ दिले नाही. त्यामुळे नवा वर्ग कुठे असेल, टीचर कोण, नवे नियम काय अशा अनेक प्रश्‍नांनी मुले भांबावून गेली. एकूणच सर्व शाळांमध्ये शाळांचा जोरात उत्साह सुरु असताना एलएफसी शाळेमध्ये मात्र पहिल्याच दिवशी मुलांची शिक्षा आणि डीसमूडने शाळेला सुरुवात झाली.