Wed, Jun 26, 2019 12:04होमपेज › Solapur › सरकारने आंदोलकांशी चर्चा करावी : सुशीलकुमार शिंदे 

सरकारने आंदोलकांशी चर्चा करावी : सुशीलकुमार शिंदे 

Published On: Jul 26 2018 11:04PM | Last Updated: Jul 26 2018 10:51PMसोलापूर : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. सरकारने मराठा समाजाशी चर्चा करून चर्चेने प्रश्‍न सोडवावा, असा सल्ला देत माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, कर्नाटक सरकारने जसा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवून केंद्राकडे पाठवला तशी महाराष्ट्र सरकारनेही आपली जबाबदारी पार पाडावी.

मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जनवात्सल्य येथे जाऊन सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. यावेळी क्रांती मोर्चाचे दिलीप कोल्हे, दास शेळके, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, बाळासाहेब गायकवाड, श्रीकांत घाडगे, योगेश पवार, किरण पवार यांच्यासह चेतन नरोटे आदी उपस्थित होते. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांसाठी येत्या 30 जुलै रोजी सोलापूर बंद पुकारले आहे, तर रविवार, 29 जुलै रोजी रूपाभवानी मंदिर येथे जागरण-गोंधळ घालून सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मराठा आंदोलनास पाठिंबा देण्याचे सूचित केल्याचे प्रताप चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शिष्टमंडळाच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, मराठा समाजाचे आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. सरकारने त्यांच्याशी चर्चा करून प्रश्‍न सोडविला पाहिजे. नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण सरकारला मराठा समाजाशी चर्चा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सरकारने चर्चेस तयार असल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी कर्नाटक सरकारने 4 टक्के आरक्षण देण्याबाबत निर्णय करून तो केंद्राकडे पाठवून दिला. महाराष्ट्र सरकारनेदेखील आपली जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे. आंदोलन आणखीन गंभीर होण्यापूर्वी सरकारने संबंधितांशी चर्चा करून चर्चेतूनच मार्ग काढण्याची गरज आहे. सरकारने चर्चेची तयारी दर्शवली असली तरी ही चर्चा लवकर होणे महत्त्वाचे आहेे, असा सल्लाही शिंदे यांनी दिला आहे.