Thu, Apr 25, 2019 03:28होमपेज › Solapur › फायनान्सचे नाव सांगून २३ हजारांची  फसवणूक

फायनान्सचे नाव सांगून २३ हजारांची  फसवणूक

Published On: May 26 2018 10:38PM | Last Updated: May 26 2018 9:56PMसोलापूर : प्रतिनिधी

बजाज फायनान्सकडून बोलतोय असे सांगून महिलेची 23 हजार रुपयांची फसवणूक करणार्‍याविरुध्द जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृगया धवल शहा (वय 36, रा. बुधवार पेठ, सम्राट चौक, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

मृगया शहा यांच्या मोबाईलवर 8 एप्रिल ते 11 एप्रिल याकालावधीत एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. फोन करणार्‍या व्यक्तीने आपण बजाज फायनान्स कंपनीकडून बोलतोय असे सांगून मृगया शहा यांना त्याने त्यांचा नाव, पत्ता, जन्म तारीख व त्याबरोबर मोबाईल नंबरवरती  बजाज फायनान्स कंपनीकडून आलेला ओटीपी क्रमांक विचारला. त्यावेळी शहा यांनी त्या व्यक्तीस सर्व माहिती सांगितली असता त्या माहितीच्या आधारे त्या व्यक्तीने फ्लिपकार्टवरुन ऑनलाईन शॉपिंग करुन 22 हजार 900 रुपयांची खरेदी केली. याबबात जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दाईंगडे तपास करीत आहेत.

रिक्षाच्या धडकेने एकाचा मृत्यू

रिक्षाच्या धडकेने रस्ता ओलांडणार्‍या व्यक्तीचा मृत्यू झाला. याबाबत रमेश सुदर्शन ढगे (वय 46, रा. जोडभावी पेठ, चिराग भवनच्या बाजूला शेरदी यांच्या घरात भाड्याने, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन समीर नूर अहमद पठाण (रा. प्लॉट नं. 118, सिध्देश्‍वरनगर भाग 4, नई जिंदगी, सोलापूर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश ढगे हे नेहमीप्रमाणे 23 मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास टिळक चौकाकडून बाळी वेसकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या दुकानाच्या बाजूच्या रस्त्यावर एकजण रस्ता क्रॉस करत होता. 
त्यावेळी समीर पठाण याने त्याच्या ताब्यातील रिक्षा क्र. एमएच 13 सीटी 1497 ही भरधाव चालवून त्या व्यक्तीला जोरदार धडक दिली. यामध्ये रस्ता ओलांडणारा व्यक्ती उपचारादरम्यान मरण पावला म्हणून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.