होमपेज › Solapur › शिक्षक पुरस्कार वितरणात रंगले मोहोळचे राजकारण 

शिक्षक पुरस्कार वितरणात रंगले मोहोळचे राजकारण 

Published On: Sep 06 2018 1:43AM | Last Updated: Sep 05 2018 10:27PMसोलापूर : प्रतिनिधी 

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत आणि जि.प. पदाधिकार्‍यांच्या अधिकारांत शासनाने कमालीचे बदल केले आहेत. त्यामुळे शासनाने शिक्षकांबरोबर पदाधिकार्‍यांची गैरसोय केली असून शासनाने यामध्ये फेरबदल करावा यावरुन जि.प.चे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे आणि नरखेड जि.प. गटाचे सदस्य उमेश पाटील यांच्यात चांगलेच राजकारण रंगले.

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण नुकतेच हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडले. यावेळी बोलताना उमेश पाटील यांनी जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांचे अधिकार कमी केल्याने कामात अनेक अडचणी येत असल्याने जि.प. सदस्य म्हणून आपण कोणत्याच शिक्षकांची बदली करु शकत नाही. त्यामुळे पदाधिकारी हतबल झाल्याचे सांगितले. शासनाने यामध्ये बदल करुन किमान दहा टक्के बदल्यांचे अधिकार पदाधिकार्‍यांना द्यावेत, अशी मागणी केली. ज्याप्रमाणे प्रशासकीय अधिकारी आणि संशोधनामध्ये शिक्षणातून संधी उपलब्ध होतात तसेच उच्च शिक्षण घेऊनही काही लोकांनी राजकारणात यावे, असे आवाहन केले. 

त्यानंतर बोलण्यासाठी सभापती विजयराज डोंगरे आले असताना त्यांनी सुरुवातीलाच मी कोणत्याच पक्षाचा नाही. त्यामुळे सत्य बोलण्यास मला काही अडचण नाही असे सांगत राजकारण उमेश पाटील सांगतात तेवढे सोपे नाही. त्यामुळे आगामीकाळात जर मोहोळ विधानसभा मतदारसंघ जनरल झाला तर उमेश पाटलांनी विधानसभा निवडणूक लढावी म्हणजे त्यांना राजकारण काय असते याचा अनुभव येईल, असे आवाहन डोंगरे यांनी केले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातच जिल्हा परिषदेचे अधिकार कमी करण्यात आले असल्याची आठवण करुन देत या पक्षाशी आता आपला काही संबंध नसल्याचा खुलासाही डोंगरे यांनी यावेळी  करुन दिला. त्यामुळे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे कट्टर विजयराज डोंगरे हे राष्ट्रवादी पक्षापासून काहीअंशी दुरावल्याचे स्पष्टपणे त्यांच्या भाषणातून दिसून येत होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या गटाची भूमिकाही स्वतंत्र असणार याचे शिक्कामोर्तबच त्यांनी केल्याचे दिसून आले.