Mon, May 20, 2019 20:34होमपेज › Solapur › सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगाला गरज सूत गिरणीची

सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगाला गरज सूत गिरणीची

Published On: Jun 17 2018 10:41PM | Last Updated: Jun 17 2018 9:08PMसोलापूर : प्रतिनिधी

येथील यंत्रमाग उद्योग सूत व कलर-केमिकलच्या दरात वाढ झाल्याने अडचणीत आल्याचे सर्वश्रृत आहे. यानिमित्ताने सोलापुरात सूत गिरणीच्या गरजेची जाणीव होत आहे. वस्त्रोद्योगाचे मोठे केंद्र म्हणून सोलापूर देश-विदेशात प्रसिद्ध आहे, पण येथील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने व पारंपरिक पद्धती पाहता येथील वस्त्रोद्योगाच्या समस्या अन्य केंद्रांच्या तुलनेत वेगळ्या आहेत. कापड गिरण्यांबरोबर सोलापुरात सूत गिरण्या  मोठ्या प्रमाणात चालायचे. पूर्व भागात यशवंत-सोलापूर या दोन्ही सहकारी सूत गिरण्यांवर एकेकाळी यंत्रमाग उद्योगाची भिस्त होते. या गिरण्यांमुळे यंत्रमाग उद्योगाला लागणार्‍या सुताचा पुरवठा तर व्हायचा, शिवाय राज्यातील सूत दरांवर स्पर्धात्मक दृष्टीकोनातून नियंत्रण ठेवण्याचे कामही यशवंत-सोलापूर गिरण्यांमुळे व्हायचा. सन 2000 च्या आसपास या दोन गिरण्या बंद पडल्या. या गिरण्यांच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्नही असफल ठरले. या दोन गिरण्या अवसायनात निघाल्यानंतर एकमेव चालू असलेली शारदा सहकारी सूत गिरणीदेखील पाच-सहा वर्षांपूर्वी बंद पडली. 

एकंदर स्थानिक सूत गिरण्या बंद पडल्याने यंत्रमागधारक अन्य शहरे किंवा परराज्यातून सूत खरेदी लागत आहे. नुकतेच सुताचे दर 15 तर कलर-केमिकलचे दर 20 टक्क्यांनी वाढले. यामुळे यंत्रमाग उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. कच्च्या मालाच्या दरात 35 टक्क्यांनी झालेली वाढ यंत्रमाग उद्योगाला अडचणीत आणली आहे. कारण अगोदरच मालाचा उठाव नव्हता. अशातच 35 टक्के दरवाढीच्या तुलनेत पक्क्या मालाला दर वाढवून मिळणे अशक्य आहे. त्यामुळे यंत्रमागधारक गत महिन्यापासून आपले कारखाने अर्धवेळ चालवित आहेत. सुट्ट्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. परिणामी कामगारांच्या मजुरीत घट झाली आहे.  हे लक्षात घेता यंत्रमाग उद्योगाबाबत फेरविचार करण्याची करण्याची वेळ आली आहे. शासनाने यासंदर्भात गांभीर्याने विचार करुन निर्णय घेण्याची मागणी जोर धरत आहे.