होमपेज › Solapur › कृत्रिम प्रयोगाद्वारे धामणीच्या पिलांचा वैरागमध्ये जन्म

कृत्रिम प्रयोगाद्वारे धामणीच्या पिलांचा वैरागमध्ये जन्म

Published On: Jun 29 2018 11:35PM | Last Updated: Jun 29 2018 11:24PMवैराग : आनंदकुमार डुरे

  निसर्गाच्या चक्रामध्ये वातावरण व नैसर्गिक साधन संपत्ती यात झाडे, निसर्गातील विविध प्राणी-पक्षी यांच्या जन्म आणि मृत्यूचे नैसर्गिकरित्या चक्र अविरत सुरू असते. यात निसर्गाच्या देणगीमुळे हे जीव जन्म घेत असतात आणि मृत्यूसुद्धा पावत असतात. पण वैरागमधील काही सर्पमित्र युवकांनी कृत्रिम प्रयोगाद्वारे धामणीच्या पिलांना  जन्माला घालण्याचा प्रयोग केला असून तो यशस्वी झाला आहे.

धामण ही आपल्या आसपास आढळणारी बिनविषारी सापाची जात आहे. उंदीर व तत्सम प्राण्यांचा फडशा पाडणारी धामण ही मानवमित्रासह अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. परंतु अज्ञानाअभावी अनेकवेळा ती मारली जाते. मात्र वैरागच्या सर्पमित्रांनी केवळ धामण बचाव व वाढीसाठीच प्रयत्न केले नाहीत, तर तिची अंडी पंच्चेचाळीस दिवस संभाळून कृत्रिम प्रयोगाद्वारे नव्या पिलांना जन्मही दिला आहे. 
विशेष म्हणजे ह्या सर्पमित्रांना त्या अंड्यांसाठी आवश्यक तापमान निर्माण करण्यात यश मिळाले असून त्यातून आठ पिल्ली निसर्गाच्या कुशीत विसावण्यास तयार झाली आहेत. 

धामण ही शेतकर्‍याचा मित्र आहे. अशा मित्राला वाचविण्याचे व वाढविण्याचे कार्य वैरागमध्ये शशिकांत भंगुरे, संकेत टिंगरे यांची टीम करीत आहे. वैरागजवळ एका ठिकाणी यांत्रिकी काम चालू  असताना जमिनीत आठ अंडी आढळून आली. अंड्याची पाहणी केल्यानंतर ती धामण जातीच्या सापाची असल्याचे दिसून आले. सर्पमित्रांनी ती सर्व अंडी अलगत उचलून आणली व स्वच्छ अशा प्लास्टिकच्या डब्यात ठेऊन त्यामध्ये ‘कोकोपिट’ टाकून कृत्रिमरित्या पिल्‍लं बाहेर येण्यासाठी साधारणतः 40 ते 45 दिवस ठेवण्यात आली. सुमारे 45 दिवसानंतर सर्पमित्रांच्या कृत्रिम प्रयोगाला व कष्टाला यश मिळाले. त्या सापडलेल्या 8 अंड्यांमधून पिल्ले जन्मास आली. आज ती सर्व पिल्ले सदृढ आहेत. काही दिवसांतच निसर्गाच्या सानिध्यात त्यांना सोडण्यात येणार आहे. हा प्रयोग मोहसीन शेख, संकेत ठेंगील, कृष्णा चौगुले, निलेश गवळी, अर्जुन हाटकर, तुषार काकरंबे आदींनी केला आहे.