Mon, Jul 22, 2019 13:11होमपेज › Solapur › वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना बदलीचे वेध!

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना बदलीचे वेध!

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 10:40PMसोलापूर : अमोल व्यवहारे

एप्रिल-मे महिना आला की अधिकार्‍यांना    लागतात   ते बदलीचे वेध. सोलापूर   शहर आणि ग्रामीण पोलिस   दलातील   वरिष्ठ अधिकार्‍यांनाही अशाचप्रकारे बदलीचे वेध  लागले  आहेत.  काही  अधिकार्‍यांनी आहे त्याच ठिकाणी मुदतवाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. काही महिन्यांपूर्वी आलेल्या सोलापूरच्या पोलिस आयुक्तांनी बदलीसाठी अर्ज दिल्याची चर्चा आयुक्तालयात होत आहे.

पोलिस उपायुक्त अपर्णा गिते या डिसेंबर 2015 मध्ये, उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी या मार्च 2016 मध्ये, तर उपायुक्त नामदेव चव्हाण हे मे 2016 मध्ये सोलापूर पोलिस आयुक्तालयामध्ये रूजू झाले आहेत.  सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांना सोलापुरात रूजू होऊन जवळपास तीन वर्षांपेक्षा जास्त  कालावधी झाला  आहे. सोलापूर शहर  पोलिस  दलातील  पोलिस उपायुक्त  नामदेव  चव्हाण, अपर्णा गिते, पौर्णिमा चौगुले तसेच  सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांचा  कार्यकाल  पूर्ण झाला आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांचा कार्यकाल मागील  वेळेसच पूर्ण झाला असून त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात  आली  होती. ती  मुदतवाढदेखील यावर्षी पूर्ण होत आहे. त्यामुळे  या  सर्व  पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या होणार, हे जवळपास निश्‍चित आहे. 

सहायक  पोलिस  आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर  यांची  बदली काही  महिन्यांपूर्वी  पुणे येथे झाली होती. लवकरच त्यांना पदोन्नती मिळणार असल्याने त्यांनी पुणे येथे झालेली बदली रद्द करुन आहे त्याच ठिकाणी   करुन  आणली  आहे. त्यामुळे त्यांच्या पदोन्नतीनंतर  त्यांची बदली होणार आहे. उपायुक्त दर्जाच्या काही अधिकार्‍यांनी सोलापुरात मुदतवाढ मिळावी म्हणून अर्ज देऊन मुदतवाढीसाठी प्रयत्न सुरु केलेले आहेत.   काही अधिकारी आपली बदली ही सोलापूरमध्ये सोलापूर   ग्रामीण, पोलिस  प्रशिक्षण  केंद्र  किंवा  राज्य  राखीव दल याठिकाणी व्हावी  याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आयुक्तालयात होत आहे. 

गेल्या काही महिन्यांपूर्वी सोलापुर आयुक्तालयामध्ये आलेल्या पोलिस आयुक्तांनीही बदलीसाठी अर्ज दिल्याची चर्चा आयुक्तालयात ऐकावयास मिळत आहे. राजकीय व्यक्तींशी पोलिस आयुक्तांचे सूत जुळले नसल्याने त्यांच्याकडून होणार्‍या त्रासामुळे आयुक्त हे नाराज असल्याने त्यांनी  बदलीसाठी स्वतः अर्ज दिल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.  सोलापूर   ग्रामीण   पोलिस  दलातील पंढरपूरचे सहायक अधीक्षक निखिल पिंगळे, सोलापूर उपविभागीय अधिकारी अभय डोंगरे, मंगळवेढा उपविभागीय  अधिकारी दिलीप जगदाळे, बार्शीचे उपविभागीय अधिकारी विजय कबाडे यांचाही कार्यकाल पूर्ण होत असून हे सर्व अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत आहेत.
 

Tags : solapur, Senior police, officers