Wed, Jul 17, 2019 20:05होमपेज › Solapur › एस. टी. कर्मचार्‍यांचा उद्या विधानभवनावर आक्रोश मोर्चा

एस. टी. कर्मचार्‍यांचा उद्या विधानभवनावर आक्रोश मोर्चा

Published On: Dec 19 2017 2:06AM | Last Updated: Dec 18 2017 9:11PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील एस.टी. कर्मचारी नागपूर येथील विधानभवनावर संघर्ष ग्रुपच्यावतीने  आक्रोश मोर्चा काढणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करा ही प्रमुख मागणी  करत 20 डिसेंबर रोजी हा आक्रोश मोर्चा काढत असल्याची माहिती  संघर्ष ग्रुपच्या व एस.टी. कर्मचार्‍यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

राज्यभरातील एस.टी. कर्मचारी सातव्या वेतन आयोगासाठी चक्‍काजाम  आंदोलन  करीत  ऑक्टोबर महिन्यात संपावर  गेले होते. एस.टी. कर्मचार्‍यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत कामावर रुजू न होण्याचा निर्णय महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेने घेतला होता. राज्यभरात एकही बस आगारातून बाहेर पडली नव्हती. पोलिसांनी व आरटीओ प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी खासगी वाहतूक व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला एस.टी. कर्मचार्‍यांनी कडाडून विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली होती. 

राज्यातील सर्व एस.टी. कर्मचारी संपावर गेल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले होते. 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून हे चक्काजाम  आंदोलन  सुरु झाले व चार दिवसांनंतर कोर्टाच्या आदेशाने आंदोलन मागे घेण्यात आले होते. या आंदोलनात चालक, वाहक, लिपीक, मेकॅनिक, स्वेच्छक, शिपाई, नवीन भरती झालेले कर्मचारी व वर्ग 4, वर्ग 3, वर्ग 2 चे कर्मचारी सहभागी झाले होते. महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेने  अनेक  वर्षांपासून  आपल्या मागण्या केल्या आहेत. कामगारांचे वेतन शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह 7 वा वेतन आयोग लागू करा ही प्रमुख मागणी आहे. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.