Thu, Apr 25, 2019 22:09होमपेज › Solapur › बहिणीच्या लग्नाला सुट्टी दिली नाही म्हणून रेल्वे ट्रॅकमॅनची आत्महत्या

बहिणीच्या लग्नाला सुट्टी दिली नाही म्हणून रेल्वे ट्रॅकमॅनची आत्महत्या

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 11:04PMसोलापूर : प्रतिनिधी

बहिणीच्या लग्नाला सुट्टी दिली नाही व गेल्या दीड वर्षापासून सुट्टी न दिल्याने सोलापूर डिव्हिजनमध्ये ट्रॅकमॅन या पदावर कार्यरत असणारा बबलू कुमार (वय 25, रा. भागलपूर, बिहार) याने बुधवारी सकाळी 9  वाजण्याच्या सुमारास वांभोरी (जि. अहमदनगर) रेल्वेस्थानकाजवळ मुंबई-साईनगर शिर्डी (गाडी क्र. 51033) या  धावत्या सुपरफास्ट एक्स्प्रेसखाली उडी मारून आत्महत्या केली आहे.
सुट्टी देण्यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी कसे त्रास देत आहेत याबद्दल आत्महत्या केलेल्या रेल्वे कर्मचार्‍याने मोबाईलमध्ये व्हिडीओ करून आपली व्यथा सांगितली आहे. या आत्महत्येमुळे सोलापूर रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे कारनामे चव्हाट्यावर आले आहेत.

बुधवारी 72 वा स्वातंत्र्यदिन असल्याने डीआरएम कार्यालयात सकाळपासून ध्वजारोहणाची गडबड होती. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; परंतु सोलापूर डीआरएम अंतर्गत येणार्‍या वांभोरी (जि. अहमदनगर) रेल्वेस्थानकाजवळ ट्रॅकमॅनने आत्महत्या केली असल्याची माहिती सोलापूर डिव्हिजनल मुख्यालयात पोहोचली. काही वेळातच वांभोरी रेल्वेस्थानकाजवळ  रेल्वे कर्मचार्‍यांनी वरिष्ठांविरोधात व त्रासाला कंटाळून कर्नाटक एक्स्प्रेस (गाडी क्र. 16229) रोखल्याची माहिती वार्‍यासारखी पसरली. यामुळे  सोलापूर मध्य रेल्वे डिव्हिजन हादरले.डीआरएम कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांची टीम घटनास्थळावर जाऊन आंदोलकांशी सकारात्मक बोलून चौकशी करण्याचे आश्‍वासन देऊन कर्नाटक एक्स्प्रेसला मार्गस्थ केले. परंतु बबलू  कुमारच्या सहकारी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी दाखल झालेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना न जुमानता त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली.

डीआरएम हितेंद्र मल्होत्रा यांनी दिवसभराचे सर्व कार्यक्रम  रद्द करून  घटनेचा आढावा घेतला. दुपारी 2 च्या सुमारास प्रसिद्धीमाध्यमांना सविस्तर माहिती दिली. चौकशी करून दोषी अधिकार्‍यांना तत्काळ निलंबित करणार असल्याची माहिती दिली.

ट्रॅकमॅन बबलू कुमार 28 फेब्रुवारी 2016 साली रेल्वे खात्यामध्ये रुजू झाला होता. दीड वर्षांपासून वरिष्ठ अधिकार्‍यांना (ज्युनियर इंजिनिअर्सना) सुट्टी मागत होता. परंतु या ना त्या कारणास्तव सुट्टी रद्द केली जात होती. यंदा बहिणीच्या लग्नाला गावी जायचे आहे त्यासाठी 28  ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत सुट्टी मागितली होती.

वरिष्ठ अधिकारी कशाप्रकारे सुट्टी रद्द करत आहेत याची सविस्तर माहिती बबलूने मोबाईलमध्ये व्हिडिओ  शूट करून रडत सांगितली होती. त्याने आपल्या सहकारी कर्मचार्‍यांसमोरदेखील कैफियत मांडली होती. सहकर्मचार्‍यांनी समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला होता. परंतु बबलूने सुट्टीसाठी शेवटी आपले जीवन संपविले.