Tue, Jul 16, 2019 00:09होमपेज › Solapur › पुणे-दौंड सेक्शनमध्ये महिनाभर ब्लॉक

पुणे-दौंड सेक्शनमध्ये महिनाभर ब्लॉक

Published On: Jul 03 2018 10:52PM | Last Updated: Jul 03 2018 10:20PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर डिव्हिजनमधील पुणे-दौंड-पुणे सेक्शनमध्ये मध्य रेल्वेकडून अप आणि डाऊन ब्लॉक घेतल्याने एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांमध्ये बदल झाला आहे. काही एक्स्प्रेस अंशत: रद्द झाल्या आहेत, तर काही उशिरा धावत आहेत. हा अप व डाऊनचा ब्लॉक 1 जुलै ते 31 जुलै एक महिनाभर असल्याने प्रवाशांना या ब्लॉकचा त्रास सोसावा लागणार आहे.

पुणे-दौंड सेक्शनमध्ये 1 जुलैपासून 31 जुलैपर्यंत   डाऊन ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे-दौंड डेमू पॅसेंजर पूर्णता रद्द करण्यात आली आहे. पुणे-हैदराबाद एक्स्प्रेस पुणे ते पाटस मार्गादरम्यान 1 तास 10 मिनिटे उशिरा धावणार आहे. पुणे-निजामाबाद  पॅसेंजर पुणे व दौंडमध्ये आंशिकरित्या रद्द करण्यात आली आहे. 

पनवेल-नांदेड एक्स्प्रेस पुणे ते  पाटस मार्गावर 1 तास 50 मिनिटे उशिरा व सावकाश चालणार आहे. दौंड ते पुणे मार्गावरील अपलाईनवर 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. बारामती-पुणे पॅसेंजर दौंड ते पुणे या  स्थानकादरम्यान रद्द करण्यात आली आहे. 

अरावती-पुणेदरम्यान धावणार्‍या एक्स्प्रेसला महिनाभर दौंड स्थानकावर 50 मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. हैदराबाद-पुणे एक्स्प्रेस दौंड स्टेशनला 1 जुलैपासून 31 जुलैपर्यंत 1 तास 50 मिनिटांपर्यंत थांबा घेणार आहे. जम्मू तावी-पुणे एक्स्प्रेस जुलै महिन्यातील बुधवार, शुक्रवार, व शनिवार  या दिवसांसाठी दौंड स्थानकावर 10 मिनिटे थांबा घेणार आहे. जबलपूर-पुणे एक्स्प्रेस जुलै महिन्यातील प्रत्येक सोमवारी 50 मिनिटे थांबणार आहे, तर दौंड-पुणे स्थानकादरम्यान धावणारी डेमू पूर्णता रद्द करण्यात आली आहे.

पुणे-दौंड सेक्शनमधील अप व डाऊनच्या ब्लॉकमुळे प्रवाशांना कसरत करत प्रवास करावा लागणार आहे. पावसाळा सुरु असल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडणार आहे.