होमपेज › Solapur › एक रुपया किलो दराने डाळिंब; उत्पादक शेतकरी संकटात

एक रुपया किलो दराने डाळिंब; उत्पादक शेतकरी संकटात

Published On: Aug 23 2018 10:46PM | Last Updated: Aug 23 2018 10:09PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एक ते सहा रुपये प्रतिकिलो डाळिंब विकला जात असल्याने डाळिंब उत्पादकांना प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. उत्पादन खर्चही भरुन निघत नसल्याने अनेक डाळिंब उत्पादन शेतकर्‍यांनी बाजार समितीत डाळिंब न आणणेच पसंत करीत असल्याचे दिसून येत आहे. 

सोलापूर जिल्ह्यात अलीकडील कांही वर्षात डाळिंबाचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. सांगोला व पंढरपूर या दोन तालुक्यासह अन्य उर्वरित तालुक्यातील शेतकर्‍यांनीही डाळिंबाच्या बागा पिकवल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील उत्पादक शेतकर्‍यांकडून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब विक्रीसाठी आणला जात आहे. याशिवाय नगर व नाशिक भागातूनही बाजार समितीत डाळिंबाची मोठी आवक वाढली गेली आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा बाजारला जसा लौकिक मिळाला आहे, तसाच लौकिक त्यापाठोपाठ डाळिंबाला मिळाला आहे. आवक वाढत असल्याने बाजार समितीत डाळिंबाचे दर दिवसागणिक कमी होत असल्याचे दिसून येत आहे. प्रती दहा किलो डाळिंबास किमान दहा रुपये, तर कमाल 600 रुपयांचा दर मिळत आहे. किरकोळ बाजारात डाळिंब दहा रुपये किलोस विकला जात आहे. 

तेल्यासारख्या रोगावर मात करीत सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी बागा विकसीत केल्या आहेत. पाणी कमी असतानाही ठिबक सिंचनावर मोठा खर्च करण्यात आला आहे. औषधोपचारासाठीही मोठा खर्च शेतकर्‍यांनी केला आहे. एका शेतकर्‍यास एका एकरासाठी सुमारे 50 हजार रुपयांचा खर्च झाला आहे. हा खर्चही डाळिंब विक्रीतून न मिळण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने डाळिंब उत्पादक बागायतदारांची पायाखालची जमीन सरकली आहे. बाजारात डाळिंब विक्रीसाठी आणल्यानंतर, आडतदारांचे कमिशन, वाहतूक खर्च, तोडणी मजुरी व हमाली आदी खर्च वजा करता शेतकर्‍यांच्या हाती केवळ शे-दोनशे रुपये शिल्लक राहत आहेत. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी बाजारात डाळिंब न आणण्याचा निर्णय घेत आहेत. काही शेतकरी तर बागा काढून त्याठिकाणी दुसरे पीक करण्याचा निर्णयही घेत असल्याचे दिसून येत आहे. 

डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याने, सरकारने डाळिंब उत्पादकांना यातून बाहेर काढण्यासाठी काही तरी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. ज्या उत्पादकांनी बाजारात डाळिंब विक्री केली आहे, अशा शेतकर्‍यांना अनुदान देण्यात यावे, अशीही मागणी होत आहे.