होमपेज › Solapur › भीमा नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी कृती आराखडा!

भीमा नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी कृती आराखडा!

Published On: Jul 03 2018 10:52PM | Last Updated: Jul 03 2018 10:30PMसोलापूर : प्रतिनिधी

नमामि चंद्रभागा प्रकल्पांतर्गत उजनी ते पुणे या नदीमार्गातील प्रदूषण कमी करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत कृती आराखडा तयार करण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या कामाची तपासणी, विविध योजनांचा आढावा, आषाढी वारीच्या तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त म्हैसेकर हे मंगळवारी सोलापूर दौर्‍यावर आले होते. सकाळी जिल्हा परिषद, तर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चंद्रभागेचा उगम भीमाशंकर येथून होतो. या नदीचा सुमारे साडेपाचशे कि.मी.चा मार्ग आहे, जो दुसर्‍या राज्यातूनही जातो. या मार्गात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. यातील उजनी ते पुणेपर्यंतच्या मार्गातील प्रदूषण दूर करण्यासाठी कृती आराखडा 15 ऑगस्टपर्यंत तयार करुन त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

आषाढी वारीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, आषाढी वारी 2018 हे अ‍ॅप प्रशासनातर्फे तयार करण्यात आले असून यामध्ये वारकर्‍यांना सोलापूर जिल्ह्यात देण्यात येणार्‍या 11 सुविधांची माहिती आहे. पाणी, आरोग्यासह तातडीच्या सेवांचाही यामध्ये अंतर्भाव आहे. गुगलच्या प्लेस्टोअरवरुन हे अ‍ॅप स्मार्ट फोनमध्ये मोफत डाऊनलोड करता येईल. इंदापूर येथे वारकर्‍यांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटरही सुरु करण्यात येणार आहे. रिंगण सोहळ्यासंदर्भात असलेले प्रश्‍न सोडविण्यात येतील. सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामात आढळलेल्या त्रुटींची पूर्तता जुलैअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले असून जर या मुदतीत पूर्तता न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे म्हैसेकर म्हणाले.

मुलांना पळवून नेल्याच्या अफवांवरुन सध्या संशयितांचे खून, हल्ले होत असल्याच्या प्रकाराबाबत विचारले असता ते म्हणाले, असे प्रकार लोकांनी करु नयेत. आधी अशा गोष्टींबाबत खातरजमा करावी.  पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी (महसूल) दीपक शिंदे आदी उपस्थित होते.