Wed, Jun 26, 2019 11:44होमपेज › Solapur › राष्ट्रवादी युवकचा आक्रोश मोर्चा

राष्ट्रवादी युवकचा आक्रोश मोर्चा

Published On: Feb 07 2018 11:17PM | Last Updated: Feb 07 2018 10:55PM सोलापूर : प्रतिनिधी 

राज्यातील लाखो तरुणांना निवडणुकीत आश्‍वासने देऊन त्यांना रोजगार देण्यास असमर्थ ठरलेल्या भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

निवडणुकीपूर्वी मोठी आश्‍वासने देऊन सत्ता मिळविलेल्या भाजप सरकारने युवकांची मोठी फसवणूक केली आहे. राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दुसरीकडे रोजगारनिर्मिती करण्यास शासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यातील तसेच जिल्ह्यातील युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर बनला असून याची शासनाला आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चार हुतात्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान बुधवारी हा आक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनेक आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत विद्यमान सरकारला खाली खेचा, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी सांगितले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रांत माने, शहराध्यक्ष भारत जाधव, संतोष पवार, जुबेर बागवान, विद्या लोलगे, मनोहर सपाटे, आनंद मुस्तारे, लतीफ तांबोळी, प्रशांत बाबर, उमेश पाटील, किसन जाधव, सायरा शेख, सिया मुलानी, गौरा कोरे, लता ढेरे, तन्वी काशीद, जयश्री पवार आदी उपस्थित होते.