Thu, Jun 20, 2019 01:19होमपेज › Solapur › मतभेद विसरुन आता एकत्र या : गारटकर

मतभेद विसरुन आता एकत्र या : गारटकर

Published On: Mar 17 2018 11:28PM | Last Updated: Mar 17 2018 11:28PMसोलापूर : प्रतिनिधी

जुने आणि नवे मतभेद बाजूला ठेवून सहा एप्रिल रोजी होणार्‍या हल्लाबोल कार्यक्रमासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन करतानाच पक्षनेतृत्वासमोर आपापसांतील मतभेद दिसणार नाहीत हे सर्वांनी वेळीच ओळखून घेतले पाहिजे, अशी सूचना राष्ट्रवादी पार्टीचे जिल्हा निरीक्षक प्रदीप गारटकर यांनी केली.

हल्लाबोल कार्यक्रमासंदर्भात शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते. गारटकर म्हणाले, सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. शरद पवार यांच्यावर जिल्हावासियांचे प्रेम आहे. राष्ट्रीय स्तरावरही पवारांचे महत्त्व मोठे आहे. याचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. पक्ष संघटना वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन नियोजन केले पाहिजे. मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. आपापसांतील धुसफूस बंद करा. यामुळे स्वतःचे आणि पक्षाचे मोठे नुकसान होणार आहे. पक्षनेतृत्वासमोर मतभेद दिसता कामा नये. प्रत्येकांनी आता आवर घालण्याची गरज आहे, असे सांगत नेत्यांकडे तक्रारी करणार्‍यांनाही निरीक्षक गारटकर यांनी निर्वाणीचा इशारा दिला.

देशभरातील चित्र बदलत आहे. आपली सत्ता येण्यासाठी नेते शरद पवार प्रयत्न करीत आहेत. त्यांना बळ देण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. नॉर्थकोट मैदानावर सहा एप्रिल रोजी सायंकाळी होणार्‍या हल्लाबोल कार्यक्रमाची  तयारी सुरू असून हा कार्यक्रम सर्वांच्या मदतीने यशस्वी करण्याचा मानस शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी बोलून दाखविला. सोलापूरकर जनतेने भाजपच्या हातात सत्ता देऊनही सोलापूरचा विकास झालेला नाही. त्यामुळे आता फक्त राष्ट्रवादी पक्षावरच जनतेचा विश्‍वास राहिला असून हल्लाबोल कार्यक्रमाच्या माध्यमातून याला सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचे प्रांतिक सदस्य आनंद मुस्तारे यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ नेते युन्‍नूसभाई शेख, गटनेते किसन जाधव, जुबेर बागवान, राजू कुरेशी, माजी महापौर मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, सुभाष पाटणकर, राजन जाधव, महेश निकंबे, विजय फुटाणे, राम साठे, चंद्रकांत पवार, मल्लेश बडगू, वैशाली गुंड, खैरूनबी शेख, बिस्मिल्ला शिकलगर, विद्या लोलगे, लता ढेरे, लता फुटाणे, सुनंदा साळुंखे, सिया मुलाणी, दिलावर मणियार, प्रमोद भोसले, जावेद खैरदी, लतीब शाब्दी, सद्दाम शाब्दी, बबलू इनामदार, सुहास कदम, अमीर शेख आदी उपस्थित होते.

 

tags : solapur, solapur news, NCP district supervisor pradip garatkar, unity in solapur NCP, dispute in solapur NCP,