होमपेज › Solapur › भरदिवसा रोखपालावर खुनी हल्ला; ४ लाख लुटीचा प्रयत्न 

भरदिवसा रोखपालावर खुनी हल्ला; ४ लाख लुटीचा प्रयत्न 

Published On: Jun 20 2018 1:17AM | Last Updated: Jun 19 2018 10:43PMसोलापूर : प्रतिनिधी

पगार करण्यासाठीची रोख रक्कम बँकेतून घेऊन जाणार्‍या कंपनीच्या रोखपालावर अज्ञात चार दरोडेखोरांनी भरदिवसा शहरातील मध्यवर्ती भागात कोयत्याने खुनी हल्ला चढविला. मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा थरारक प्रकार रंगभवन परिसरतील ख्रिश्‍चन स्मशानभूमीवर रस्त्यावर घडला. जिवावर उदार होऊन रोखपालाने हल्लेखोरांना प्रतिकार करत आपल्याजवळील चार लाख रुपयांची रोख रक्कम वाचविली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

जखमी रोखपालास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यंकटराज व्यंकटय्या पेरला (वय 40, रा. वसुंधरा सोसायटी, रंगराजनगर, मार्केट यार्ड, सोलापूर) असे गंभीर जखमी झालेल्या रोखपालाचे नाव असून व्यंकटराजू पेरला हा एमआयडीसीमधील दयाकर नरसय्या राचर्ला यांच्या कला टेक्सस्टाईल या कंपनीत रोखपाल पदावर कामास आहे. बुधवारी कंपनीला सुटी असल्याने मंगळवारी सायंकाळी कंपनीतील कामगारांचा पगार करण्यात येतो. त्या पगारासाठी लागणारी रक्कम ही पेरला हे रेल्वेलाईन येथील इंडियन बँकेच्या शाखेतून काढून ते पैसे घेऊन त्यांच्या दुचाकीवरुन  शांतीसागर मंगल  कार्यालयामार्गे  ख्रिश्‍चन स्मशानभूमीसमोरील रस्त्याने रंगभवनकडे येत होते. त्यावेळी अचानक दोन दुचाकींवरून आलेल्या अनोळखी चौघा हल्लेखोरांनी पेरला यांच्यावर धारदार शस्त्रानिशी हल्ला चढविला. पेरला यांच्या डोक्यावर, हातावर कोयत्याने वार केल्याने ते दुचाकीवरुन खाली पडले. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण करुन त्यांच्याकडील पैशाची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु पेरला यांनी जोरदार आरडाओरड केली. त्यामुळे रस्त्यावरुन जाणारे-येणारे व आजूबाजूचे लोक जमा झाल्याने हल्लेखोरांनी दुचाकीवरून पळ काढला.

या घटनेची माहिती समजताच गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, परिमंडळाच्या पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अभय डोंगरे, वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त वैशाली शिंदे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील,  सदर बझार पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरसिंग अंकुशकर, कंपनीचे मालक राचर्ला यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या पेरला यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसराची नाकाबंदी करून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. कंपनीची मोठी रक्कम घेऊन जाणार्‍या पेरला यांच्यावर पाळत ठेऊनच हा हल्ला करुन पैसे लुटण्याचा प्रयत्न करण्यात झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.