होमपेज › Solapur › सोलापूर मनपा बरखास्त करा : काँग्रेस

सोलापूर मनपा बरखास्त करा : काँग्रेस

Published On: Feb 12 2018 7:32PM | Last Updated: Feb 12 2018 7:32PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेतील सत्ताधार्‍यांच्या गटबाजीला आता स्वकीय भाजपबरोबरच विरोधी पक्षदेखील वैतागलेले दिसत आहेत. या गटबाजीमुळेच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन महापालिका बरखास्तीची मागणी केली आहे. 

पालकमंत्रीविरुद्ध सहकारमंत्री असे दोन गट महापालिकेत कार्यरत आहेत. हे दोन्ही एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. असे चित्र गेले वर्षभर कायम आहे. ही कुरघोडी चक्क विरोधी पक्षांच्या मदतीने केली जात असल्याने मनपात सत्ताधारी कोण व विरोधक कोण, हेच समजेनासे झाले आहे. महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करुन हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर तीन महिने वाट पाहू, मनपा कारभारात सुधारणा न झाल्यास मनपा बरखास्त करु, असा सज्जड दमही मुख्यमंत्र्यांनी दिला होता. याउपरही या दोन्ही गटांनी गटबाजीतच धन्यता मानल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. सोमवारी सभागृहनेते पदावरुन या दोन गटांची भूमिका भिन्न होती. मनपा सभेत या प्रत्येक गटाचा एक असे एकूण दोन सभागृहनेत्यांनी सूचना वाचून नवा वाद निर्माण केला.
या प्रकाराबद्दल आश्‍चर्य व्यक्त करीत विरोधी पक्ष काँग्रेसने सोमवारी  सत्ताधार्‍यांवर टीका केली. गटनेते चेतन नरोटे यांनी आणखी तीन सभेचे कामकाज पाहू. जर सत्ताधार्‍यांमध्ये सुधारणा न झाल्यास नाईलाजास्तव मनपा बरखास्तीचा विषय उचलू, असा इशारा दिला. यानंतर सायंकाळी आ. प्रणिती शिंदे यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन मनपा बरखास्तीच्या मागणीचे निवेदन दिले. 

यावेळी माजी आ. दिलीप माने, शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे,  नगरसेवक बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी, वैष्णवी करगुळे, फिरदोस पटेल, परवीन इनामदार आदी उपस्थित होते.