Mon, May 27, 2019 08:40होमपेज › Solapur › म्हसवड ते टेंभुर्णी राष्ट्रीय मार्गाचे काम बंद पाडले

म्हसवड ते टेंभुर्णी राष्ट्रीय मार्गाचे काम बंद पाडले

Published On: Mar 21 2018 11:01PM | Last Updated: Mar 21 2018 10:57PM सोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर जिल्ह्यातील सातारा -लातूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून माळशिरस तालुक्यातील म्हसवड ते टेंभुर्णी असा हा महामार्ग जात असून या ठिकाणी शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता त्यांच्या जमिनी बळकावून रस्त्याचे काम सुरू असल्याने या भागातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी या राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पाडले.

माळशिरस तालुक्यातील जळभावी, मांडकी, इस्लामपूर, शेवरे, संगम, तांबवे, गणेशगाव, लवंग, टेंभुर्णी, गोरडवाडी, भांबुर्डी, मोटेवाडी या भागातून हा महामार्ग जात आहे. या रस्त्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. अशाही परिस्थितीत हा रस्ता सातारा, म्हसवड, टेंंभुर्णी, लातूर असा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 सी म्हणून जाहीर करण्यात आला आहे.तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणाचेही काम सुरू आहे. या रस्त्यासाठी एमएसआरडीसी यांनी तयार केलेल्या प्रकल्प अहवालामध्ये एकूण 24 मीटर रुंदीचा हा रस्ता होणे अपेक्षित आहे.तथापि, यासाठी विभागाने कोणत्याही शेतकर्‍याला पूर्वकल्पना दिलेली नाही. तसेच यासाठी भूसंपादन झालेले नाही. त्यामुळे बळजबरीने आणि दांडगाईने या रस्त्याचे काम चालू असून हा शेतकर्‍यांवर अन्याय असल्याने हा रस्ता होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला असून यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी याकडे लक्ष द्यावे, यासाठी या गावातील शेकडो शेतकर्‍यांनी बुधवारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन या घटनेची कल्पना दिली.

यावेळी धर्मराज मेटे-पाटील, विशाल मस्के, पांडुरंग सुतार, दादासाहेब हुलगे, अजिनाथ कर्णवर, संजय वाघमोडे, दत्तात्रय सर्जे, विठ्ठल बंडगर, महादेव वाघमोडे, सचिन देशमुख, मिलिंद कुलकर्णी आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.