Thu, Jan 24, 2019 16:01होमपेज › Solapur › बाजार समिती निवडणूक; बिगुल वाजले!

बाजार समिती निवडणूक; बिगुल वाजले!

Published On: May 29 2018 1:27AM | Last Updated: May 29 2018 12:21AMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम सहकार निवडणूक प्राधिकरणाने तातडीने जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या 1 जुलैला मतदान, तर 3 जुलैला मतमोजणी होणार आहे.
बाजार समितीमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चांगलीच चर्चेत आली  आहे. मोठी आर्थिक  उलाढाल असलेल्या  सोलापूर  कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चंग बांधला आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक मोठ्या चुरशीने होणार असल्याने या निवडणुकीच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

सोमवारी निवडणूक प्राधिकरणाकडून सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतरित्या जाहीर झाला आहे. 29 मे ते 2 जूनपर्यंत नामनिर्देशने पत्र दाखल करण्यात येणार आहेत. 4 जून रोजी आलेल्या अर्जांची छाननी होणार आहे. 5 जून रोजी वैध अर्जांचे प्रसिध्दीकरण होणार आहे. निवडणुकीतून अर्ज माघार घेण्यासाठी 19 जूनपर्यंत मुदत आहे.  20 जूनला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. 1 जुलै रोजी मतदान, तर 3 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.  

सहकारमंत्री विरुद्ध काँग्रेस असा रंगणार सामना
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वारे  जोराने वाहू लागले आहे. वरकरणी ही निवडणूक काँग्रेसविरुध्द भाजप अशी दिसत असली तरी खरा सामना हा सहकारमंत्री विरुध्द काँग्रेस अशीच होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने या निवडणुकीसाठी मोठी चुरस होणार आहे.