Thu, Apr 25, 2019 23:24होमपेज › Solapur › मनोज पाटील सोलापूरचे नवे पोलिस अधीक्षक; प्रभूंची मुंबईत बढती 

मनोज पाटील सोलापूरचे नवे पोलिस अधीक्षक; प्रभूंची मुंबईत बढती 

Published On: Jul 28 2018 11:00PM | Last Updated: Jul 28 2018 9:56PMसोलापूर : प्रतिनिधी

ठाणे शहर पोलिस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेले मनोज पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, तर पोलिस अधीक्षक एस़ वीरेश प्रभू यांची बदली मुंबई येथे वाहतूक शाखेत झाली आहे.  शहर-जिल्ह्यातील बदलात चार पोलिस अधिकार्‍यांचा समावेश आहे. 

राज्यातील भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकार्‍यांच्या बदल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केल्या. त्यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील चार पोलिस अधिकार्‍यांचा समावेश आहे़ पोलिस अधीक्षक एस़  वीरेश प्रभू यांची मुंबई येथे वाहतूक शाखेत, तर सोलापूर शहर पोलिस दलातील पोलिस उपायुक्त पदावर कार्यरत असलेले नामदेव चव्हाण यांची जालना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे़   याशिवाय पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांची औरंगाबाद राज्य गुप्तवार्ता विभागात नियुक्ती करण्यात आली आहे़. सोलापूर ग्रामीणचे सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांची वर्धा येथे अप्पर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाची ख्याती आहे. या पंढरपूरच्या आषाढी वारीचा बंदोबस्त म्हणजे मोठा जीकिरीचा विषय असतो. मात्र, वीरेश प्रभू यांनी अशा चार वार्‍यांचा चोख बंदोबस्त करुन कोणतीही जीवितहानी, वित्तहानी होऊ दिली नाही. या वारीचा अनुभव असल्यानेच या बदल्या पेंडिंग पडल्या होत्या. वारी सुखरुप होताच मुख्यमंत्र्यांनी बदल्यांच्या फाईल्सवर सही केली. पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांची सोलापूरची कारकीर्द पाहूनच त्यांना पंढरपूरचा प्रसाद मिळाला आणि त्यांची बढती होऊन बदली झाली. 

रूजू होणारे अधिकारी 

मनोज पाटील (ठाणे शहर पोलिस उपायुक्त - सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक नियुक्ती), मधुकर गायकवाड (औरंगाबाद राज्य गुप्त वार्ता विभाग उपायुक्त - सोलापूर शहर पोलिस उपायुक्त नियुक्ती), विशाल सिंगुरी (बीड सहायक पोलिस अधीक्षक - सोलापूर अप्पर पोलिस अधीक्षक नियुक्ती), एस.एच. महावरकर (मुंबई राज्य गुप्तवार्ता विभाग  उपायुक्त - सोलापूर शहर पोलिस उपायुक्त नियुक्ती)